महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या 14 महत्त्वाच्या निर्णयांची यादी; शेतकऱ्यांना मोफत धान्य
महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने आजच्या बैठकीत सामान्य नागरिकांसाठी 14 महत्त्वाचे निर्णय घेतले. यातील सर्वात मोठा निर्णय म्हणजे राज्यातील 33 जिल्ह्यांमधील 42 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना पुढील तीन महिने मोफत धान्य पुरवठा करण्याचा आहे. तसेच आर्थिक फसवणूक करणाऱ्या संस्थांविरोधात कठोर पावले उचलण्यासाठी स्वतंत्र न्यायाधिकरण स्थापन करण्याची मंजुरी देण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने आजच्या बैठकीत राज्यातील विविध घटकांसाठी, विशेषतः शेतकरी, विद्यार्थी, शिक्षक आणि कामगार यांच्या हितासाठी अत्यंत महत्त्वाचे 14 निर्णय घेतले. या निर्णयांचा थेट फायदा राज्यातील लाखो नागरिकांना होणार आहे. या बैठकीतील सर्वात चर्चित निर्णय म्हणजे शेतकऱ्यांसाठी मोफत धान्य योजना जाहीर करणे. तसेच आर्थिक फसवणूक करणाऱ्या संस्थांच्या मालमत्ता जप्त करण्यासाठी स्वतंत्र न्यायाधिकरण स्थापन करण्याचा प्रस्तावालाही मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली आहे. शेतकऱ्यांना दिलासा देणे, विद्यार्थ्यांच्या निर्वाह भत्त्यात वाढ करणे, शिक्षकांसाठी आर्थिक सुविधा उपलब्ध करून देणे आणि कामगार कायद्यात सुधारणा करणे यांसारख्या अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर या बैठकीत निर्णय घेण्यात आले.
शेतकऱ्यांसाठी मोफत धान्य योजना
मंत्रिमंडळाच्या बैठकीतील सर्वात महत्त्वाच्या निर्णयांपैकी एक म्हणजे शेतकऱ्यांना मोफत धान्य देण्याचा निर्णय. राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत दारिद्र्यरेषेखालील आणि थेट लाभ हस्तांतरण (DBT) योजनेत समाविष्ट नसलेल्या राज्यातील 33 जिल्ह्यांमधील 42 लाख 30 हजार 783 शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. या शेतकऱ्यांना पुढील तीन महिने दरमहा प्रति व्यक्ती 5 किलो धान्य मोफत दिले जाणार आहे. यामध्ये 3 किलो तांदूळ आणि 2 किलो गव्हाचा समावेश असेल. वाढत्या महागाईच्या काळात या निर्णयामुळे अनेक कुटुंबांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.
नर्मदा-तापी वळण योजनेला मंजुरी
नंदुरबार जिल्ह्यातील सिंचन व्यवस्था मजबूत करण्यासाठी मंत्रिमंडळाने नर्मदा-तापी वळण योजनेला मंजुरी दिली आहे. या योजनेसाठी 5 हजार 548 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या प्रकल्पात सहा वळण बंधारे उभारण्यात येणार आहेत. त्यातून सुमारे 26 हजार 526 हेक्टर क्षेत्राला सिंचनाची सुविधा मिळणार आहे. विशेष म्हणजे, या प्रकल्पातून 11.50 मेगावॉट वीजनिर्मितीही होणार आहे. त्यामुळे शेतीसाठी पाणी उपलब्ध होण्यासोबतच वीज उत्पादनालाही मदत होईल.
आर्थिक फसवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई
गुंतवणूकदार आणि ठेवीदारांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या संस्थांविरोधात कठोर पावले उचलण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. अशा संस्थांची मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया अधिक वेगाने पूर्ण व्हावी, यासाठी स्वतंत्र एमपीआयडी (MPID) न्यायाधिकरण स्थापन करण्यात येणार आहे. या न्यायाधिकरणामार्फत संबंधित प्रकरणांचा निकाल 90 दिवसांच्या आत लावण्याची कालमर्यादा निश्चित केली जाणार आहे. यासाठी संबंधित कायद्यात सुधारणा करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये ठेवीदारांना लवकर न्याय मिळण्यास मदत होण्याची अपेक्षा आहे.
विद्यार्थ्यांच्या निर्वाह भत्त्यात वाढ
वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठीही महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आरोग्य विज्ञानाशी संबंधित व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांमध्ये शिकणाऱ्या EBC, SEBC आणि EWS प्रवर्गातील विद्यार्थ्यांना डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेंतर्गत अधिक आर्थिक मदत मिळणार आहे. या योजनेत विद्यार्थ्यांच्या भोजन, निवास आणि दैनंदिन खर्चासाठी दिल्या जाणाऱ्या भत्त्यात वाढ करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे आर्थिक अडचणींमुळे शिक्षण घेताना अडथळे येणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत होईल.
शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी आर्थिक सुविधा
शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी आर्थिक सक्षमीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शालार्थ प्रणालीमध्ये समाविष्ट असलेल्या कर्मचाऱ्यांना आरबीआयकडे नोंदणीकृत बिगर बँकिंग वित्तीय संस्थांच्या माध्यमातून आर्थिक सुविधा मिळू शकणार आहेत. यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांना आर्थिक गरजांच्या वेळी मदत मिळण्याचा मार्ग मोकळा होईल.
खासगी अनुदानित शाळांसाठी स्वतंत्र कायदा
राज्यातील खासगी अनुदानित शाळांचे कामकाज आणि नियमन अधिक व्यवस्थित करण्यासाठी सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. 'महाराष्ट्र खाजगी अनुदानित शाळा (विनियमन) विधेयक, 2026' या नवीन विधेयकाच्या प्रारूपाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. या कायद्यामुळे खासगी अनुदानित शाळांच्या कामकाजासाठी नियमांची एक निश्चित चौकट तयार करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
ग्रंथपालांना सातव्या वेतन आयोगाचा लाभ
खासगी अनुदानित आयुर्वेद आणि युनानी महाविद्यालयांमध्ये पूर्णवेळ काम करणाऱ्या ग्रंथपालांसाठीही दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. या ग्रंथपालांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार सुधारित वेतनश्रेणी लागू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांच्या वेतनात सुधारणा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
माथाडी आणि खासगी सुरक्षा रक्षकांच्या कायद्यात बदल
कामगारांच्या हिताशी संबंधित दोन महत्त्वाच्या कायद्यांमध्ये सुधारणा करण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. यामध्ये महाराष्ट्र माथाडी, हमाल व इतर श्रमजीवी कामगार अधिनियम 1969 आणि महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक अधिनियम 1981 यांचा समावेश आहे. या कायद्यांमध्ये आवश्यक बदल करून कामगारांशी संबंधित व्यवस्था अधिक प्रभावी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
अॅक्युपंक्चर उपचार पद्धतीबाबत निर्णय
वैद्यकीय शिक्षण विभागाशी संबंधित आणखी एका प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. राष्ट्रीय सहयोगी आणि आरोग्यसेवा व्यवसाय आयोग अधिनियम, 2021 म्हणजेच NCAHP कायद्यातून अॅक्युपंक्चर उपचार पद्धती वगळण्यासंदर्भातील विधेयकाच्या प्रारूपाला मान्यता देण्यात आली आहे.
महसूल विभागाचे कामकाज वेगवान होणार
महसूल विभागातील प्रकरणांचा निपटारा जलद आणि पारदर्शक पद्धतीने व्हावा, यासाठी 'रेव्हेन्यू कोर्ट केस मॅनेजमेंट सिस्टीम' लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रणालीमुळे महसूल विभागातील अर्धन्यायिक प्रकरणांचे व्यवस्थापन अधिक सोपे होईल. तसेच 'एक जिल्हा, एक अपील' ही तरतूद लागू करण्यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 मध्ये सुधारणा केली जाणार आहे.
मुद्रांक शुल्काच्या नियमांमध्ये सुधारणा
महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमातील काही तरतुदींमध्ये बदल करण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. अभिनिर्णय फी आणि अपील फीच्या दरांमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी या कायद्यातील कलम 32 (ब) आणि 53 (1अ) मध्ये सुधारणा केली जाणार आहे. यामुळे संबंधित शुल्क आकारणीच्या प्रक्रियेत अधिक स्पष्टता आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
दोन विद्यापीठांच्या कायद्यांमध्ये समानता
रामटेक येथील कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय आणि नाशिक येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ यांच्या अधिनियमांमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दोन्ही विद्यापीठांमधील कुलसचिव नियुक्ती, समित्यांची रचना आणि लेखासंबंधीच्या तरतुदींमध्ये समानता आणली जाणार आहे. यासाठी संबंधित विद्यापीठांच्या कायद्यांमध्ये आवश्यक बदल केले जातील.
लोकसेवा हक्क कायद्यात बदल होणार
सरकारी सेवा नागरिकांना ठरावीक वेळेत मिळाव्यात, यासाठी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 मध्ये सुधारणा करण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. या कायद्यातील काही तरतुदी बदलण्याचा प्रस्ताव आता विधिमंडळासमोर मांडला जाणार आहे. यामुळे सरकारी सेवांमधील प्रक्रिया अधिक प्रभावी करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
मौदा नगर पंचयतीला शासकीय जमीन
नागपूर जिल्ह्यातील मौदा नगर पंचयतीच्या प्रशासकीय इमारतीसाठी शासकीय जमीन देण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे मौदा नगर पंचयतीच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या उभारणीचा मार्ग मोकळा होईल. परिणामी, स्थानिक नागरिकांना नगर पंचयतीशी संबंधित कामांसाठी अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होण्यास मदत होईल.
नागरिकांना काय फायदा होणार?
आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेल्या निर्णयांचा विचार केला, तर त्यामध्ये शेती, शिक्षण, आरोग्य, रोजगार, कामगार कल्याण आणि सरकारी प्रशासन अशा विविध क्षेत्रांचा समावेश आहे. शेतकऱ्यांना मोफत धान्य, विद्यार्थ्यांना वाढीव निर्वाह भत्ता, ठेवीदारांच्या पैशांच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र न्यायाधिकरण आणि कामगार कायद्यातील सुधारणा हे निर्णय महत्त्वाचे आहेत. मात्र, यातील काही निर्णयांची अंमलबजावणी संबंधित कायद्यातील सुधारणा, विधिमंडळाची मंजुरी आणि पुढील शासन आदेशांनंतर होईल. त्यामुळे प्रत्यक्ष लाभ कधीपासून मिळणार, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.
X.Badami--BD