MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: आयोगातील अधिकारी मुख्य सूत्रधार; ३ हजार पानांचे आरोपपत्र दाखल
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणात गुन्हे शाखेने धक्कादायक खुलासा केला आहे. तपासात असे समोर आले आहे की, आयोगातील सहायक कक्ष अधिकारी विश्वेश्वर नाकते हा या गैरप्रकाराचा मुख्य सूत्रधार आहे. त्याने प्रश्नपेढीतील सुमारे ३०० प्रश्न लॅपटॉपवर टाईप करून अवर सचिव अभिजित लेंडवे यांच्याकडे सुपूर्द केले होते. या प्रकरणी गुन्हे शाखेने विशेष न्यायालयात ३ हजारहून अधिक पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे.
मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणात गुन्हे शाखेने केलेल्या तपासात अत्यंत धक्कादायक खुलासा झाला आहे. या तपासातून असे समोर आले आहे की, आयोगातीलच एका अधिकाऱ्याने प्रश्नपेढीतील सुमारे ३०० गोपनीय प्रश्न लॅपटॉपवर टाईप करून त्याच्या प्रती वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणातील सहायक कक्ष अधिकारी विश्वेश्वर नाकते याला मुख्य सूत्रधार ठरविण्यात आले आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखेने विशेष न्यायालयात सहा आरोपींविरुद्ध ३ हजारहून अधिक पानांचे पहिले आरोपपत्र दाखल केले आहे.
औषध निरीक्षक पदासाठी २२ मार्च रोजी राज्यातील सहा केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली होती. अन्न व औषध प्रशासनातील १५४ पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. या परीक्षेच्या प्रश्नपेढीतील गोपनीय प्रश्नांपर्यंत आयोगातील सहायक कक्ष अधिकारी विश्वेश्वर नाकते याची पोहोच होती. त्याच्याकडे प्रश्नांच्या मूळ संचाची (मेटा सेट) जबाबदारी होती. याच संचातून अंतिम प्रश्नपत्रिका तयार केली जाते. नाकते याने प्रश्नपेढीतील सुमारे ३०० प्रश्न स्वतःच्या लॅपटॉपवर टाईप केले. त्यानंतर त्याची प्रिंट काढून नवी मुंबईतील आयोगाच्या कार्यालयाच्या वाहनतळावर अवर सचिव अभिजित लेंडवे यांच्याकडे सुपूर्द केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपपत्रात हा दावा करण्यात आला आहे.
पेपरफुटी उघड झाल्यास वरिष्ठ अधिकाऱ्याचे संरक्षण मिळावे, या उद्देशाने नाकते याने लेंडवे यांना कथित कटात सहभागी करून घेतले. त्यानंतर प्रश्नांचा संच पुढे अन्य व्यक्तींपर्यंत पोहोचल्याचे तपासात समोर आले आहे. आयोगातील गोपनीय विभागातील प्रश्नपेढीची सुरक्षा भेदून प्रश्न बाहेर कसे गेले, याचा तपशील आरोपपत्रात मांडण्यात आला आहे.
गुन्हे शाखेने २६ ऑगस्ट रोजी अटक केलेल्या पहिल्या सहा आरोपींचा या आरोपपत्रात समावेश आहे. त्यामध्ये सहायक कक्ष अधिकारी विश्वेश्वर नाकते, अवर सचिव अभिजित लेंडवे, आयोगातील अधिकारी गोपाळ मराठे, मध्यस्थ प्रवीण पाटील, ऋतुजा पाटीलचे वडील अमृत पाटील आणि तिचा पूर्वीचा मित्र गौरव ऊर्फ लोकेश पाटील यांचा समावेश आहे. या सर्वांविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यासह संबंधित तरतुदींनुसार तपास करण्यात आला आहे.
या प्रकरणात ऋतुजा पाटील आणि गौरव ऊर्फ लोकेश पाटील यांच्यातील संबंध बिघडल्याने पेपरफुटीचा प्रकार उघड झाल्याचे आरोपपत्रातून समोर आले आहे. ऋतुजाने परीक्षेनंतर पालकांच्या विरोधामुळे गौरवशी बोलणे बंद केले होते. पालकांनी या संबंधांना विरोध करत आत्महत्येची धमकी दिल्याचे ऋतुजाने पोलिसांना सांगितल्याचे आरोपपत्रात नमूद आहे. याचा राग आल्याने गौरवने एमपीएससीला ई-मेल पाठवून ऋतुजाकडे परीक्षेपूर्वीच प्रश्न असल्याची तक्रार केली. सुरुवातीला पेपरफुटी उघड करणारा माहितीदार म्हणून पुढे आलेल्या गौरवचीही या प्रकरणातील कथित भूमिका तपासात समोर आली आहे.
या प्रकरणात आतापर्यंत एकूण १३ आरोपींना अटक करण्यात आली असून दोन आरोपी अद्याप फरार आहेत. पहिल्या आरोपपत्रात सहा जणांविरुद्ध पुरावे सादर करण्यात आले आहेत. उर्वरित आरोपींच्या भूमिकेबाबत तपास सुरू असून डिसेंबरमध्ये पुरवणी आरोपपत्र दाखल होण्याची शक्यता आहे. सर्व अटक केलेले आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.
दरम्यान, पेपरफुटी प्रकरणामुळे राज्यभरातील उमेदवारांमध्ये संताप व्यक्त झाला होता. अखेर २५ ऑगस्ट रोजी औषध निरीक्षक पदाची संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द करण्यात आली. त्यामुळे या प्रकरणातील आरोपपत्रातून प्रश्नपत्रिकेच्या गोपनीयतेचा भंग कसा झाला, यंत्रणेतील कोणकोणत्या स्तरावर संगनमत होते आणि आणखी कोणाला या पेपरचा लाभ मिळाला, याबाबत महत्त्वाचे धागेदोरे समोर येण्याची शक्यता आहे.
T.Deshpande--BD