मुंबई महापालिकेच्या मुदतठेवींमध्ये ११ हजार कोटींची घट; भाजप सरकारवर काँग्रेसचा आरोप
आशियातील सर्वात श्रीमंत नगरपालिका असलेल्या मुंबई महापालिकेच्या मुदतठेवींमध्ये (Fixed Deposits) प्रचंड घट झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. २०२१ मध्ये ९१,६९० कोटी रुपये असलेल्या या ठेवी ऑक्टोबर २०२६ पर्यंत ७९,८७३ कोटींवर आल्या आहेत. भाजपची सत्ता आल्यापासून तिजोरीत गळती लागल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.
आशिया खंडातील सर्वात श्रीमंत नगरपालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेच्या (BMC) आर्थिक स्थितीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. २०२१ मध्ये पालिकेकडे असलेल्या मुदतठेवींमध्ये (Fixed Deposits) प्रचंड घट झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. भाजपची सत्ता आल्यापासून पालिकेच्या तिजोरीत गळती लागल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.
२०२१ मध्ये मुंबई महापालिकेकडे एकूण ९१,६९० कोटी रुपये इतक्या मुदतठेवी होत्या. मात्र, ऑक्टोबर २०२६ च्या अखेरपर्यंत या ठेवींचे प्रमाण ७९,८७३ कोटी रुपयांवर आले आहे. यामुळे एकूण ११,८१७ कोटी रुपयांची घट झाल्याचे दिसून येते. चालू आर्थिक वर्षातही या ठेवींमध्ये आणखी घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पालिकेच्या विविध विभागांच्या शिल्लक रकमा विविध बँकांमध्ये मुदतठेवी म्हणून ठेवल्या जातात. या ठेवींवरून पालिकेच्या आर्थिक स्थितीचा अंदाज लावला जातो. पालिकेच्या या मुदत ठेवींमधूनच आस्थापना खर्च आणि निवृत्त कर्मचाऱ्यांची देणी दिली जातात. तसेच, विविध विकासकामांसाठी कंत्राटदारांकडून घेतलेल्या अनामत रकमांचाही या ठेवींमध्ये समावेश असतो.
ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस मुदतठेवींचा लेखाजोखा प्रशासनाने स्थायी समितीपुढे मांडला आहे. त्या अहवालात मे महिन्याअखेरपर्यंत ठेवींमध्ये दोन हजार कोटींची वाढ झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. मात्र, यावरून ठेवी नेमक्या किती आहेत, त्यात किती घट झाली आणि ती कोणत्या कारणाने झाली, असे प्रश्न निर्माण झाले आहेत.
२०२१ मध्ये ९१,६९० कोटी रुपयांच्या मुदत ठेवी होत्या. अलीकडच्या काळात त्यातून आठ हजार कोटी रुपये काढण्यात आले होते, ज्यावरून मोठा वादंग माजला होता. नुकताच सादर झालेल्या अहवालानुसार, १ मे २०२६ रोजी मुदतठेवी सुमारे ७७,३१० कोटी होत्या. मे महिन्यात सुमारे ८,८४० कोटींची नवी गुंतवणूक करण्यात आली. त्याच काळात सुमारे ६,८४० कोटींच्या ठेवी परिपक्व झाल्या. नवी गुंतवणूक आणि परिपक्व ठेवी यांचा हिशेब केल्यावर निव्वळ वाढ सुमारे १,९९४ कोटी झाली. यामुळे ३१ मे २०२६ रोजी एकूण मुदतठेवी सुमारे ७९,३०४ कोटी झल्या.
मात्र, आता २०२१ ते २०२६ या कालावधीत मिळणारे व्याज लक्षात घेतले तर ठेवींमध्ये ३० हजार कोटींची वाढ होऊन एकूण ठेवी सुमारे १ लाख कोटींच्या घरात असायला हव्यात. मग फक्त ७९ हजार ३०४ कोटी रकमेच्याच ठेवी का दिसत आहेत, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
२०२१ मध्ये महापालिकेची एफडी एकूण ९१,६९० कोटी रुपये होती. ऑक्टोबर २०२६ मध्ये ती ७९,८७३ कोटी रुपये राहिली आहे. म्हणजेच ११,८१७ कोटी रुपयांनी कमी झाली आहे. मार्च २०२६ मध्ये तर ती ७७,९०५ कोटी रुपयेपर्यंत खाली गेली होती, म्हणजे १३,७८५ कोटी रुपयांनी कमी झाली होती.
मुदत ठेवींच्या व्याजापोटी मिळालेले ३० हजार कोटी गेले कुठे, असा प्रश्न करतानाच काँग्रेस गटनेते अश्रफ आझमी यांनी मुदत ठेवींच्या संदर्भात श्वेतपत्रिका (White Paper) काढण्याची मागणी पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. मुदत ठेवीतून किती पैसे काढले, ते कोणत्या कामात खर्च झाले, २.४४ लाख कोटी रुपयांच्या प्रकल्पांसाठी ठेवीनाच हात घालणार का, असा सवाल त्यांनी केला आहे.
F.Mahajan--BD