ठाण्यात एसएसओ कॅन्सर हॉस्पिटलचे नवे केंद्र सुरू; ३० हून अधिक तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार
कर्करोगग्रस्तांच्या उपचारांसाठी मुंबईकडे धावपळ कमी करण्याच्या उद्देशाने ठाण्यात एसएसओ कॅन्सर हॉस्पिटलचे नवे अत्याधुनिक केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्रात ३० हून अधिक अनुभवी तज्ज्ञ डॉक्टरांची टीम कार्यरत राहणार असून, निदानापासून शस्त्रक्रिया आणि उपचारानंतरच्या पुनर्वसनापर्यंत सर्व सुविधा एकाच छताखाली मिळणार आहेत. प्रसिद्ध कर्करोग तज्ज्ञ डॉ. राजेंद्र बडवे यांच्या उपस्थितीत झालेल्या उद्घाटन समारंभात रुग्णांना वेळेवर आणि योग्य उपचार मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
ठाणे : कर्करोगाचे निदान झाल्यावर केवळ रुग्णच नव्हे, तर संपूर्ण कुटुंबाची उपचारांसाठी धावपळ सुरू होते. अनेकदा तपासण्यांसाठी एका रुग्णालयात तर शस्त्रक्रिया आणि औषधोपचारांसाठी दुसऱ्या रुग्णालयात फेऱ्या माराव्या लागतात. यामुळे वेळ, पैसा आणि मानसिक त्रासाची भर पडते. मात्र, कर्करोगग्रस्तांची ही फरपट कमी करण्याच्या उद्देशाने आता ठाण्यात ३० हून अधिक तज्ज्ञ डॉक्टरांची टीम सज्ज झाली आहे. एसएसओ कॅन्सर हॉस्पिटल्सने शहरात अत्याधुनिक कर्करोग उपचार केंद्र सुरू केले असून, निदानापासून शस्त्रक्रिया आणि उपचारानंतरच्या पुनर्वसनापर्यंत विविध सेवा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्याचा निर्धार करण्यात आला आहे.
कर्करोगाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर विशेष उपचारांसाठी मुंबईतील मोठ्या रुग्णालयांवर अवलंबून राहावे लागू नये, या उद्देशाने ठाण्यात हे केंद्र सुरू करण्यात आले आहे. प्रसिद्ध कर्करोग शल्यविशारद तथा टाटा मेमोरियल सेंटरचे माजी संचालक डॉ. राजेंद्र बडवे, माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू जाँटी ऱ्होड्स, डॉ. चैत्रा शेट्टी आणि डॉ. निलेश चोरडिया यांच्या उपस्थितीत या केंद्राचे उद्घाटन झाले.
कर्करोगावरील उपचार ही केवळ एका डॉक्टरची जबाबदारी नसून, विविध शाखांतील तज्ज्ञांच्या समन्वयातून उपचारांची दिशा निश्चित करणे आवश्यक असते. हीच बाब लक्षात घेऊन या केंद्रात शस्त्रक्रिया तज्ज्ञ, रक्तविकार व कर्करोग तज्ज्ञांसह ३० हून अधिक अनुभवी डॉक्टरांची टीम कार्यरत राहणार आहे. प्रत्येक रुग्णाच्या आजाराचे स्वरूप, कर्करोगाची अवस्था आणि शारीरिक स्थिती तपासून स्वतंत्र उपचार आराखडा तयार केला जाणार आहे.
या केंद्रात कर्करोगाच्या विशेष शस्त्रक्रिया, केमोथेरपी, विविध निदान चाचण्या, आनुवंशिक कर्करोगाच्या जोखमीची तपासणी आणि किरणोपचारांसाठी मार्गदर्शन उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे, उपचार संपल्यानंतरही रुग्णांना वाऱ्यावर न सोडता पुनर्वसन, शारीरिक उपचार, नियमित तपासण्या आणि घरगुती उपचारांसाठी मदत केली जाणार आहे. विमा आणि आर्थिक साहाय्याबाबत मार्गदर्शनासह चोवीस तास औषधसेवा व वैद्यकीय मदतीची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे रुग्णालय प्रशासनाने स्पष्ट केले.
दरम्यान, प्रत्येक कर्करोगग्रस्ताची प्रकृती आणि आजाराची तीव्रता वेगवेगळी असते. त्यामुळे सर्व रुग्णांवर एकाच पद्धतीने उपचार करणे योग्य ठरत नाही. रुग्णाच्या वैद्यकीय तपासण्यांचा सखोल अभ्यास करूनच उपचारांची दिशा निश्चित केली जाईल, असे डॉ. निलेश चोरडिया यांनी सांगितले. कर्करोगाचा आघात केवळ रुग्णालाच नव्हे, तर संपूर्ण कुटुंबाला सहन करावा लागतो. त्यामुळे आजाराबाबत जनजागृती आणि वेळेवर उपचार घेण्याची मानसिका निर्माण होणे गरजेचे असल्याचे मत जाँटी ऱ्होड्स यांनी व्यक्त केले.
कर्करोगाची चाहूल देणाऱ्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये. तोंडातील जखम बरी न होणे, गिळताना त्रास होणे, आवाजात बदल होणे, मानेवर गाठ येणे किंवा सतत घसा दुखणे ही डोके व मानेच्या कर्करोगाची संभाव्य लक्षणे असू शकतात. मात्र, अनेकजण या त्रासाकडे किरकोळ आजार म्हणून दुर्लक्ष करतात. हे दुर्लक्ष गंभीर ठरू शकते. लक्षणे दीर्घकाळ टिकल्यास तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. कर्करोगाचे लवकर निदान झाल्यास उपचार अधिक प्रभावी होऊ शकतात. तंबाखू, धूम्रपान आणि मद्यपान टाळण्याचे आवाहन डॉ. चैत्रा शेट्टी यांनी केले.
उपचारांसोबत मदतीचा हात देणे देखील महत्त्वाचे आहे. कर्करोगाच्या उपचारांचा खर्च, वारंवार कराव्या लागणाऱ्या तपासण्या आणि उपचारानंतरचे पुनर्वसन यामुळे रुग्णांच्या कुटुंबीयांवर मोठा ताण येतो. त्यामुळे वैद्यकीय उपचारांबरोबरच विमा आणि आर्थिक मदतीच्या उपलब्ध पर्यायांबाबत मार्गदर्शन करण्यावर या केंद्राचा भर राहणार आहे. तसेच रुग्णांना नियमित तपासण्या, फिजिओथेरपी आणि आवश्यक वैद्यकीय साहाय्य उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
V.Upadhyay--BD