FDA चा कडक वॉच: हेल्थ सप्लिमेंट्स आणि प्रोटीन पावडर जाहिरातींवर निर्बंध; दिशाभूल करणाऱ्या इन्फ्लुएंसर्सना १० लाखांचा दंड
राज्यातील अन्न व औषध प्रशासनाने (FDA) हेल्थ सप्लिमेंट्स, प्रोटीन पावडर आणि इतर आरोग्य उत्पादनांच्या दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवर कडक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिलेल्या माहितीनुसार, नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर ५ ते १० लाखांपर्यंतचा दंड ठोठावला जाईल. तसेच, ग्राहकांच्या सेवनाने मृत्यू झाल्यास जन्मठेपेची शिक्षा भोगावी लागू शकते.
राज्यातील नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या बनावट हेल्थ सप्लिमेंट्स आणि दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) आक्रमक पवित्रा घेतला आहे. राज्यातील अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत, राज्यात हेल्थ सप्लिमेंट्स, न्यूट्रास्युटिकल्स आणि विशेष आहाराबाबत कडक नियमावली लागू करण्याची घोषणा केली. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर आता कठोर कायदेशीर आणि आर्थिक कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा मुंढे यांनी दिला.
सध्या बाजारात प्रोटीन पावडर, मल्टी-व्हिटॅमिन गोळ्या, वजन घटवणाऱ्या गोळ्या, क्रीडा पूरक आहार आणि विविध हर्बल प्रोडक्ट्सची मोठ्या प्रमाणात विक्री सुरू आहे. मात्र, १३ नोव्हेंबर रोजी एफडीएने केलेल्या कारवाईत अनेक गंभीर प्रकार निदर्शनास आले आहेत. या उत्पादनांमध्ये प्रत्यक्षात वेगळाच घटक असतो आणि ग्राहकांची फसवणूक करत त्यांची विक्री भलत्याच नावाने केली जात असल्याचे समोर आले आहे.
ही नवीन नियमावली फक्त उत्पादकांपुरती मर्यादित नसून संपूर्ण साखळीला लागू करण्यात आली आहे. यामध्ये उत्पादक, पुरवठादार, वितरक, आयातदार, औषधालये, तसेच जिम आणि हेल्थ सेंटर्सचा समावेश आहे. या सर्वांकडे एफडीएचा अधिकृत परवाना असणे आता कायद्याने बंधनकारक करण्यात आले आहे.
सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्सवर करडी नजर
सध्या सोशल मीडियावर अनेक इन्फ्लुएंसर्सकडून प्रोटीन पावडर, झटपट वजन घटवणे किंवा चेहऱ्यावर ग्लो येतो असे खोटे व अतिशयोक्तीपूर्ण दावे करून जाहिराती केल्या जात आहेत. या जाहिरातींना भुलून लहान बालके, गर्भवती माता, रुग्ण आणि खेळाडू कोणत्याही वैद्यकीय सल्ल्याविना हे पदार्थ 'औषध' समजून सेवन करत आहेत, जे त्यांच्या जिवावर बेतू शकते. त्यामुळे आता सोशल मीडियावरील अशा दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवरही एफडीएची करडी नजर राहणार असून, संबंधित इन्फ्लुएंसर्सवर कठोर कारवाई केली जाणार आहे.
नागरिकांना सतर्क करताना आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले की, हेल्थ सप्लिमेंट्स हे केवळ दैनंदिन आहाराला पूरक असतात; त्यांच्या सेवनाने कोणताही आजार बरा होत नाही. त्यामुळे त्यांना औषध समजण्याची चूक करू नये. तसेच, उत्पादनांमध्ये प्री-बायोटिक, प्रो-बायोटिक किंवा इतर विशेष घटकांच्या वापरासाठी एफडीएची पूर्वपरवानगी घेणे अनिवार्य असणार आहे.
नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर शिक्षेची तरतूद
या नवीन नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्यांसाठी कठोर दंड आणि शिक्षेची तरतूद केली आहे. यानुसार, नियमावलीचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर ५ लाख रुपयांपर्यंत दंडात्मक कारवाई केली जाईल. तसेच, ग्राहकांची दिशाभूल करणारी जाहिरात केल्यास किंवा एफडीएच्या परवान्याविना व्यवसाय केल्यास थेट १० लाख रुपयांपर्यंत दंड ठोठावला जाणार आहे. विशेष म्हणजे, या सप्लिमेंट्सच्या सेवनाने एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास संबंधितांना थेट जन्मठेपेची शिक्षा भोगावी लागू शकते.
अन्न व औषध प्रशासनाने यापूर्वीही अनेकदा बनावट आरोग्य उत्पादनांविरोधात कारवाई केली आहे, परंतु आताच्या नवीन नियमावलीमुळे ही प्रक्रिया अधिक कठोर आणि पारदर्शक होणार आहे. आयुक्त मुंढे यांनी नागरिकांना विनंती केली की, कोणत्याही हेल्थ सप्लिमेंटचा वापर करण्यापूर्वी त्यांच्या वैद्यकीय सल्ल्याचा आधार घ्यावा आणि केवळ एफडीएच्या मान्यताप्राप्त उत्पादनांचाच वापर करावा.
R.Altobelli--BD