नीट-यूजी २०२६ पेपरफुटी प्रकरणी राऊस अव्हेन्यू न्यायालयाने १४ आरोपींवर आरोप निश्चित
नीट-यूजी २०२६ परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणात महत्त्वाचा टप्पा पार पडला आहे. दिल्लीतील राऊस अव्हेन्यू न्यायालयाने शनिवारी (२१ नोव्हेंबर) १४ आरोपींविरोधात औपचारिक आरोप निश्चित केले. सीबीआयच्या तपासात एनटीएशी संबंधित तीन विषयतज्ज्ञांसह प्रश्नपत्रिका बाहेर नेणाऱ्या मध्यस्थ आणि विक्रेत्यांचा समावेश आहे. सर्व आरोपींनी न्यायालयासमोर हजर होऊन आरोप मान्य करण्यास नकार दिला असून, २५ नोव्हेंबरपासून खटल्याची सुनावणी सुरू होणार आहे.
दिल्लीतील राऊस अव्हेन्यू न्यायालयाने नीट-यूजी (NEET UG) २०२६ परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणात महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. शनिवारी (२१ नोव्हेंबर) या प्रकरणातील १४ आरोपींविरोधात न्यायालयाने औपचारिक आरोप निश्चित केले. सर्व आरोपी न्यायालयासमोर हजर झाले, परंतु त्यांनी आपल्यावर लावलेले आरोप मान्य करण्यास नकार दिला. या निर्णयानंतर, २५ नोव्हेंबरपासून या प्रकरणाच्या नियमित खटल्याची सुनावणी सुरू होणार आहे.
सीबीआयने (CBI) सादर केलेल्या आरोपपत्रात एनटीएशी (NTA) संबंधित तीन विषयतज्ज्ञांचा समावेश असून, त्यांच्यावर प्रश्नपत्रिका तयार करण्याच्या गोपनीय प्रक्रियेत सहभाग आणि प्रश्न बाहेर काढल्याचा आरोप आहे. या व्यतिरिक्त, प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणाऱ्या कथित मध्यस्थ, शिकवणी चालक आणि आर्थिक व्यवहारात सहभागी असलेल्या अनेक व्यक्तींवरही आरोप निश्चित करण्यात आले आहेत. या प्रकरणात फसवणूक, गुन्हेगारी कट, विश्वासघात, पुरावे नष्ट करणे, भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा, सार्वजनिक परीक्षा गैरप्रकार प्रतिबंधक कायदा आणि कॉपीराइट कायद्यांतर्गत आरोप लावण्यात आले आहेत.
एनटीएशी संबंधित तीन विषयतज्ज्ञांवर गोपनीय प्रश्न बाहेर काढल्याचा गंभीर आरोप आहे. यात जीवशास्त्र विषयाच्या तज्ज्ञ मनीषा गुरुनाथ मांढरे, रसायनशास्त्राच्या तज्ज्ञ पी. व्ही. कुलकर्णी आणि भौतिकशास्त्राच्या तज्ज्ञ मनीषा संजय हवालदार यांचा समावेश आहे. सीबीआयच्या आरोपपत्रानुसार, कुलकर्णीने रसायनशास्त्राचे १३५ प्रश्न आणि पर्याय चिठ्ठ्यांवर लिहून गोपनीय विभागातून बाहेर नेले. मांढरे यांनी एनसीईआरटी (NCERT) पुस्तकांच्या आधारे प्रश्नांचे संबंधित धडे आणि परिच्छेद ओळखून विद्यार्थ्यांना प्रश्न समजावून सांगितल्याचा आरोप आहे. तर हवालदारने भौतिकशास्त्राचे प्रश्न बाहेर काढून ते पुढे पोहोचविण्यासाठी सहकाऱ्यांची मदत घेतली.
महाराष्ट्रातून प्रश्नांच्या वितरणाची साखळी उघडकीस आली आहे. भौतिकशास्त्राचे प्रश्न हस्तलिखित स्वरूपात तयार करून ते हवालदारच्या पतीच्या मोबाईलवर पाठविण्यात तेजस हरशदकुमार शाह याने मदत केल्याचा आरोप आहे. लातूरमधील कोचिंग क्लासेसशी संबंधित शिवराज मोटेगावकरने सुमारे पाच लाख रुपयांच्या व्यवहारातून रसायनशास्त्राचे प्रश्न मिळवले. त्याच्या मोबाईलमधून १३६ हस्तलिखित प्रश्न जप्त करण्यात आले असून, त्यापैकी १११ प्रश्न एनटीएच्या प्रश्नसंचाशी जुळल्याचे सीबीआयने नमूद केले आहे.
लातूरमधील सिद्धिविनायक हॉस्पिटलचे संचालक डॉ. मनोज शिरुरे यावर विद्यार्थ्यांपर्यंत प्रश्न पोहोचविण्यासाठी हॉस्पिटलचा वापर होऊ दिल्याचा आणि मोटेगावकर व कुलकर्णी यांच्यात मध्यस्थी केल्याचा आरोप आहे. मनीषा वाघमारे हिने विद्यार्थ्यांची व्यवस्था करून प्रश्नांच्या नोट्स आणि गोपनीय माहिती एकत्रित केल्याचा आरोप आहे. धनंजय लोखंडे याने वाघमारेकडून प्रश्न मिळवून ते पुढे विकण्याचा व्यवहार केला, तर शुभम मधुकर खैरनार याने हे प्रश्न विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रती आणि नोट्स तयार केल्या.
हरियाणा आणि राजस्थानपर्यंत प्रश्नांचा प्रसार झाल्याचा दावा सीबीआयने केला आहे. यश यादव याने शुभम खैरनारकडून प्रश्न मिळवून ते हरियाणा आणि इतर राज्यांतील संपर्कांपर्यंत पोहोचवले. मांगीलाल बिवाल याने मुलासाठी प्रश्न मिळविण्याचा आर्थिक व्यवहार केला, तर दिनेश बिवाल आणि विकास बिवाल यांनी प्रश्नांच्या प्रती तयार करणे आणि वितरण करण्यात सहभाग घेतला.
पुण्यातील कोचिंग क्लासेसबाहेर चहाचा स्टॉल चालविणाऱ्या शेषराव सूर्यवंशीवर दोन विद्यार्थ्यांना साडेचार लाख रुपयांत प्रश्नपत्रिका मिळवून देण्याचे आश्वासन दिल्याचा आरोप आहे. त्याच्यामार्फत आठ अन्य विद्यार्थ्यांपर्यंतही प्रश्न पोहोचल्याचे सीबीआयने आरोपपत्रात नमूद केले आहे.
सीबीआयने या प्रकरणात ३६० साक्षीदार, ४२२ कागदपत्रे आणि ४३ वस्तुनिष्ठ पुराव्यांच्या आधारे आरोप सिद्ध करण्याची तयारी केली आहे. दरम्यान, या प्रकरणात अद्याप कोणत्याही सरकारी अधिकारी किंवा एनटीएच्या उच्च पदाधिकाऱ्याला आरोपी करण्यात आलेले नाही. सर्व आरोपींवरील आरोप न्यायालयीन खटल्यात सिद्ध होणे बाकी आहे.
नीट-यूजी पेपरफुटी प्रकरणी संसदीय समितीकडून एनटीए प्रमुखांना समन्स बजावण्यात आले आहेत. केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दावा केला होता की, नीट परीक्षा पद्धती पूर्णपणे सुरक्षित आहे आणि यात गैरव्यवहार अशक्य आहे. तथापि, सीबीआयच्या तपासात एनटीएशी संबंधित तज्ज्ञांचा थेट सहभाग उघडकीस आला आहे. विद्यार्थ्यांमध्ये या प्रकरणाचा मोठा संताष पसरला असून, विरोधकांनीही सरकारचे लक्ष वेधले आहे.
G.Luthra--BD