दादर मेट्रो स्थानकाला 'चैत्यभूमी' नाव; सचिन खरात यांचा नेत्यांना सवाल
दादर मेट्रो स्थानकाला 'चैत्यभूमी' हे नाव देण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला जाणार असल्याचे परिवहन विभागाच्या सूत्रांनी स्पष्ट केले आहे. यापूर्वी DGIPR च्या चुकीच्या प्रसिद्धीपत्रकामुळे रेल्वे स्थानकाच्या नामांतराचा गोंधळ निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर सचिन खरात यांनी दादर रेल्वे स्थानकालाही हे नाव मिळावे, अशी मागणी केली आहे.
मुंबई : दादर स्थानकाच्या नामांतरावरून गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला राजकीय आणि प्रशासकीय गोंधळ अखेर दूर झाला आहे. केंद्र सरकारकडे पाठवला जाणारा नामकरणाचा प्रस्ताव हा दादर रेल्वे स्थानकासाठी नसून, दादर मेट्रो स्थानकासाठी असल्याची महत्त्वपूर्ण माहिती परिवहन विभागातील सूत्रांनी दिली आहे. या स्पष्टीकरणामुळे राज्यात पसरलेली चर्चा आणि संभ्रम दूर झाला आहे.
यापूर्वी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या (DGIPR) एका प्रसिद्धीपत्रकात चुकून 'दादर रेल्वे स्थानक' असा उल्लेख करण्यात आला होता. या त्रुटीमुळे दादर रेल्वे स्थानकाचेच नाव बदलले जाणार असल्याची चर्चा जोरात सुरू झाली होती आणि त्यावरून राजकीय वादही निर्माण झाले होते. मात्र, कोणत्याही मेट्रो स्थानकाचे नाव बदलण्यासाठी रीतसर प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवावा लागतो. प्रशासकीय तपासणीनंतर हा प्रस्ताव रेल्वे स्थानकाचा नसून दादर मेट्रो स्थानकासंदर्भातच असल्याचे आता निश्चित झाले आहे.
या सर्व घडामोडींवर प्रतिक्रिया देताना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (सचिन खरात गट) चे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. दादर मेट्रो स्थानकाला 'चैत्यभूमी' नाव देण्याच्या घोषणेबद्दल त्यांनी स्वागत आणि अभिनंदन केले. मात्र, त्याच वेळी त्यांनी दादर रेल्वे स्थानकाच्या नामांतराचा मुद्दाही लावून धरला आहे.
खरात यांनी स्पष्ट केले की, "दादर मेट्रो स्थानकाला 'चैत्यभूमी' नाव देण्याच्या घोषणेबद्दल आपण मुख्यमंत्र्यांचे स्वागत आणि अभिनंदन करतो, परंतु दादर रेल्वे स्थानकालाही 'चैत्यभूमी' नाव देण्यात यावे, ही आमची भूमिका यापुढेही कायम राहील."
यासोबतच, सचिन खरात यांनी दादर रेल्वे स्थानकाच्या नामांतराला विरोध करणाऱ्या नेत्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ठाकरे गटाचे आमदार महेश सावंत, मनसेचे नगरसेवक यशवंत किल्लेदार आणि शिंदे गटाचे उपनेते शिशिर शिंदे यांनी दादर रेल्वे स्थानकाच्या नामांतराला विरोध दर्शवला आहे. या नेत्यांच्या भूमिकेबाबत सचिन खरात यांनी राज्यातील प्रमुख नेत्यांना थेट सवाल केला आहे.
खरात यांनी विचारले की, "दादर रेल्वे स्थानकाला चैत्यभूमी नाव देण्यास विरोध करणारे ठाकरे गटाचे आमदार महेश सावंत, मनसेचे नगरसेवक यशवंत किल्लेदार आणि शिंदे गटाचे उपनेते शिशिर शिंदे यांची ही भूमिका अनुक्रमे उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मान्य आहे का?"
या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी राज्यातील प्रमुख नेत्यांनी दादर नामांतराबद्दल आपली अधिकृत भूमिका स्पष्ट करावी, असे खरात यांनी सूचित केले. त्यांनी आणखीन इशारा दिला की, "अन्यथा आंबेडकरी समाज त्यांना कधीही माफ करणार नाही."
मेट्रो स्थानकाच्या नामांतराचा तिढा सुटला असला तरी, सचिन खरात यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे दादर रेल्वे स्थानकाच्या नामांतरावरून राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मेट्रो स्थानकाला मिळणाऱ्या या नवीन नावाचा प्रस्ताव अद्याप केंद्र सरकारच्या मंजुरीसाठी प्रलंबित असून, तो मंजूर झाल्यासच हे नाव अधिकृत होईल.
C.F.Salvi--BD