महानदी कोलफिल्ड्स IPO: गुंतवणूकदारांकडून अपेक्षित प्रतिसाद नाही; ग्रे मार्केटमध्ये निराशाजनक कामगिरी
कोल इंडियाच्या उपकंपनी असलेल्या महानदी कोलफिल्ड्सच्या आयपीओला गुंतवणूकदारांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. आयपीओ खुलल्यानंतर दोन दिवस उलटूनही ५० टक्के सबस्क्रिप्शन पूर्ण झाले नसून ग्रे मार्केटमध्येही निराशाजनक कामगिरी दिसत आहे, ज्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये सावधगिरीची भावना पसरली आहे.
कोल इंडियाच्या उपकंपनी असलेल्या महानदी कोलफिल्ड्स लिमिटेड (Mahanadi Coalfields Limited) च्या आयपीओला गुंतवणूकदारांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. शेअर बाजारात सध्या चर्चेत असलेल्या या आयपीओला खुलल्यानंतर दोन दिवस उलटूनही ५० टक्के सबस्क्रिप्शन पूर्ण झालेले नाही. विशेष म्हणजे, ग्रे मार्केटमध्ये (GMP) देखील या आयपीओची कामगिरी निराशाजनक असल्याचे दिसत आहे. यामुळे गुंतवणूकदारांनी या ऑफरपासून काहीशी सावध भूमिका घेतली आहे.
महानदी कोलफिल्ड्सचा आयपीओ १९ नोव्हेंबर रोजी खुला झाला होता. गुंतवणूकदारांना २३ नोव्हेंबरपर्यंत या आयपीओमध्ये पैसे गुंतवण्याची संधी आहे. आज बाजार बंद होईपर्यंत या आयपीओला पूर्ण प्रतिसाद मिळतो का, याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. आज सकाळपर्यंत उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार, महानदी कोलफिल्ड्सच्या आयपीओला एकूण ०.५२ टक्के सबस्क्रिप्शन मिळाले आहे.
वेगवेगळ्या गुंतवणूकदार श्रेणींमधील प्रतिसाद पाहिला तर रिटेल गुंतवणूकदारांचा सहभाग सर्वात कमी असल्याचे दिसते. रिटेल श्रेणीत हा आयपीओ केवळ ०.२८ पट सबस्क्राइब झालाय. दुसरीकडे, पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या (QIB) श्रेणीत १.३७ पट सबस्क्रिप्शन मिळालंय. तर बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या (NII) श्रेणीत केवळ ०.२३ पट बोली लागली आहे.
दरम्यान, या आयपीओसाठी १८ नोव्हेंबर रोजीच अँकर गुंतवणूकदारांकडून बोली मागवण्यात आली होती. त्यातून कंपनीनं २,२९५.२५ कोटी रुपये उभे केले आहेत. महानदी कोलफिल्ड्सच्या IPO चा एकूण आकार ८,९८१.१२ कोटी रुपये आहे. या आयपीओच्या माध्यमातून कंपनीची प्रवर्तक असलेली कोल इंडिया ६६.१८ कोटी शेअर्सची विक्री करत आहे. हा मेनबोर्ड श्रेणीतील आयपीओ आहे.
कंपनीनं आयपीओसाठी प्रति शेअर १२९ ते १३६ रुपये असा प्राइस बँड निश्चित केलाय. एका लॉटमध्ये ११० शेअर्सचा समावेश आहे. त्यामुळे किरकोळ गुंतवणूकदारांना किमान १४,९६० रुपये गुंतवावे लागतील. कंपनीनं आपल्या कर्मचाऱ्यांसाठी विशेष सवलतही जाहीर केली आहे. कर्मचाऱ्यांना प्रत्येक शेअरवर ६ रुपयांची सूट दिली जाणार आहे. याशिवाय, कर्मचाऱ्यांसाठी ३,३०,९१,८१५ शेअर्स राखीव ठेवण्यात आलेत.
या आयपीओसाठी एसबीआय कॅपिटल मार्केट्स लिमिटेडची लीड मॅनेजर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर केफिन टेक्नॉलॉजीजकडे रजिस्ट्रारची जबाबदारी देण्यात आली आहे.
महानदी कोलफिल्ड्सच्या आयपीओबाबत ग्रे मार्केटमधूनही फारसे उत्साहवर्धक संकेत मिळत नाहीत. इन्व्हेस्टर्स गेनच्या अहवालानुसार, आज हा आयपीओ ग्रे मार्केटमध्ये केवळ ०.७० रुपयांच्या प्रीमियमवर व्यवहार करत आहे. विशेष म्हणजे, गेल्या काही दिवसांपासून या आयपीओच्या ग्रे मार्केट प्रीमियममध्ये कोणताही बदल झालेला नाही. या आयपीओचा आतापर्यंतचा सर्वाधिक GMP ९.२५ रुपये होता. मात्र, सध्याचा प्रीमियम पाहता लिस्टिंगबाबत गुंतवणूकदारांचा उत्साह कमी असल्याचे संकेत मिळत आहेत.
३० जून २०२६ पर्यंतच्या आकडेवारीनुसार, महानदी कोलफिल्ड्सकडे एकूण १७ खाणी होत्या. यापैकी १४ खाणी खुल्या स्वरूपातील, तर ३ खाणी भूमिगत आहेत. कंपनीच्या कर्मचारी संख्येबाबत बोलायचं झाल्यास, ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत महानदी कोलफिल्ड्समध्ये एकूण २०,५२६ कायमस्वरूपी कर्मचारी कार्यरत होते.
(टीप - यामध्ये केवळ आयपीओ विषयी समान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
L.Apte--BD