हुतात्मा दिनी रेल्वे स्थानकांवर महाराष्ट्र गीत वाजवण्याची मागणी
छटपूजेनिमित्त रेल्वे स्थानकांवर भोजपुरी गाणी वाजविण्याच्या निर्णयानंतर आता मराठी अभ्यास केंद्राने हुतात्मा दिनी महाराष्ट्र गीत वाजवण्याची मागणी केली आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील हुतात्म्यांच्या स्मरणार्थ ही मागणी करण्यात आली असून, मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाला स्वतंत्र निवेदने देण्यात आली आहेत.
छटपूजेनिमित्त रेल्वे स्थानकांवर भोजपुरी गाणी वाजविण्याच्या निर्णयानंतर राज्यात चर्चेला उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर मराठी अभ्यास केंद्राने हुतात्मा दिनी राज्यातील सर्व रेल्वे स्थानकांवर महाराष्ट्र गीत वाजवण्याची मागणी केली आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील १०७ हुतात्म्यांच्या बलिदानाची आठवण नव्या पिढीला व्हावी आणि प्रवाशांना महाराष्ट्राच्या इतिहासाची माहिती मिळावी, या उद्देशाने ही मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात केंद्राने मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाला स्वतंत्र निवेदने दिली आहेत.
२१ नोव्हेंबर १९५५ रोजी संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीसाठी मुंबईत काढण्यात आलेल्या मोर्चावर गोळीबार झाला होता. या आंदोलनात अनेक आंदोलक हुतात्मा झाले. त्यांच्या स्मरणार्थ दरवर्षी २१ नोव्हेंबरला हुतात्मा दिन पाळला जातो. या पार्श्वभूमीवर, मराठी अभ्यास केंद्राने रेल्वे प्रशासनाला दिलेल्या निवेदनात स्पष्ट मागणी केली आहे की, २१ नोव्हेंबरला सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत महाराठातील सर्व रेल्वे स्थानकांवर हुतात्मा दिनाचे महत्त्व सांगणारी विशेष उद्घोषणा करण्यात यावी. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील आंदोलकांवर २१ नोव्हेंबर १९५५ रोजी झालेल्या गोळीबाराची आठवण करून देत सर्व हुतात्म्यांना आदरांजली वाहणारी उद्घोषणा प्रसारित करावी, असे केंद्राने सुचविले आहे.
स्थानकांवरील ध्वनिक्षेपकांवरून ठराविक वेळाने 'जय जय महाराष्ट्र माझा' हे राज्यगीत तसेच 'बहु असोत सुंदर संपन्न की महा' हे महाराष्ट्र गीत वाजविण्यात यावे, अशीही मागणी निवेदनात करण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात रेल्वेचे जाळे पसरले असून दररोज लाखो प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. त्यामुळे महाराष्ट्राच्या इतिहासाची आणि हुतात्म्यांच्या बलिदानाची जाणीव प्रवाशांपर्यंत पोहोचविण्यासाठी रेल्वेने पुढाकार घ्यावा, असे निवेदनात म्हटले आहे.
मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष डॉ. दीपक पवार आणि कार्यवाह आनंद भंडारे यांनी ही निवेदने दिली आहेत. मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाने या मागणीचा सकारात्मक विचार करून संबंधित स्थानकांना आवश्यक निर्देश द्यावेत, अशी विनंती करण्यात आली आहे. भोजपुरी गाण्यांच्या प्रसारणानंतर आता महाराष्ट्र गीतांच्या मागणीला रेल्वे प्रशासन कसा प्रतिसाद देते, हे २१ नोव्हेंबरपूर्वी स्पष्ट होण्याची अपेक्षा आहे.
महाराष्ट्रातील रेल्वे स्थानकांवर महाराष्ट्राच्या भाषा, संस्कृती आणि इतिहासाशी संबंधित गाणी वाजविणे ही रेल्वेची प्राथमिक जबाबदारी आहे. २१ नोव्हेंबर हा महाराष्ट्राच्या इतिहासातील महत्त्वाचा दिवस असून, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील हुतात्म्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी राज्यातील सर्व रेल्वे स्थानकांवर महाराष्ट्र गीत वाजविले गेले पाहिजे. केवळ गीत वाजवून रेल्वेची जबाबदारी संपत नाही. हुतात्मा दिनाचा इतिहास, त्याचे महत्त्व आणि १०७ हुतात्म्यांचे योगदान यांची माहिती शोधून ती प्रवाशांपर्यंत पोहोचविण्याचे काम रेल्वेच्या जनसंपर्क विभागाने करावे. यातून रेल्वेची महाराष्ट्राशी असलेली सांस्कृतिक बांधिलकी दिसून येईल, असे डॉ. दीपक पवार यांनी नमूद केले.
मराठी अभ्यास केंद्राने महाराष्ट्रातील रेल्वे स्थानकांवर स्थानिक संस्कृतीला प्राधान्य देण्याऐवजी अन्य राज्यांतील सणांची गाणी वाजविण्याचा आक्षेप घेतला आहे. प्रवाशांनी आक्षेप घेतल्यास दिल्लीवरून आदेश असल्याचे सांगितले जाते, असा दावा केंद्राने केला आहे. हुतात्मा दिनी महाराष्ट्र गीत वाजविण्यास रेल्वे बोर्डाची बंदी आहे का, असा सवाल करत केंद्राने बोर्डाच्या अध्यक्षांनाही पत्र पाठविले आहे. यासंदर्भात लवकरच पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडेही पाठपुरावा करण्यात येणार आहे.
V.Ishfan--BD