ठाण्यात छठपूजा उत्सवात एकनाथ शिंदे यांचा हजेरी; 'छठपूजा जोरदार साजरी झाल्याने कोरोना पळाला' असे विधान
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी ठाण्यातील रायलादेवी तलाव येथे छठपूजा उत्सवात हजेरी लावली. यावेळी त्यांनी सणांचे महत्त्व मांडताना विरोधकांना राजकारण न करण्याचा इशारा दिला. छठपूजा जोरदार साजरी झाल्याने कोरोना पळून गेला, अशी मिश्किल टिप्पणी करत त्यांनी सार्वजनिक उत्सवांचे कौतुक केले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी ठाण्यातील रायलादेवी तलाव येथे छठपूजा उत्सवात हजेरी लावली. महाराष्ट्रात गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दसरा आणि दिवाळी यांसारखेच छठपूजा उत्सवही जोरदार साजरे केले जातात, मात्र या सणांच्या वेळी कोणतेही राजकारण करू नये, असे मत शिंदे यांनी यावेळी व्यक्त केले. उत्तर भारतीय समाजाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात दरवर्षी उपमुख्यमंत्री शिंदे सहभागी होतात. यंदाही त्यांनी पुण्याहून नियोजित दौरा आटोपून वागळे इस्टेटमधील रायलादेवी तलाव येथे दाखल झाले.
उत्सवाच्या आयोजनासाठी शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित असल्याचे दर्शवत, उत्तर भारतीय समाजाशी संवाद साधताना शिंदे म्हणाले की, आमचे शिवसैनिक तुमच्या सोबत आहेत. यावेळी खासदार नरेश म्हस्के, नगरसेवक राम रेपाळे, विकार रेपाळे आणि नम्रता भोसले-जाधव उपस्थित होते. छठपूजेचे महत्त्व विशद करताना शिंदे यांनी सांगितले की, या पूजेमध्ये उगवत्या सूर्याबरोबरच मावळत्या सूर्याचीही आराधना केली जाते. सूर्य हा समस्त सजीवसृष्टीचा आधार असून त्याच्या उपासनेतून निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते. महिला अत्यंत श्रद्धेने आणि भक्तिभावाने हे व्रत करतात. आपल्या कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी, मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि समाजाच्या कल्याणासाठी केली जाणारी ही उपासना भारतीय संस्कृतीतील एक अनोखी परंपरा आहे.
महाराष्ट्र ही विविध भाषा, धर्म आणि संस्कृतींचा संगम असलेली भूमी आहे. प्रत्येक समाजाचे सण-उत्सव हे आपल्या सामाजिक ऐक्याचे बळ आहेत. त्यामुळे अशा धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन शिंदे यांनी केले. उत्सवांच्या माध्यमातून बंधुभाव अधिक दृढ करण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.
मुख्यमंत्री म्हणून २०२२ मध्ये जबाबदारी स्वीकारल्यानंतर कोविड काळातील निर्बंध हळूहळू हटवून सर्व सण-उत्सव आणि धार्मिक कार्यक्रमांना मोकळीक देण्याचा निर्णय घेतल्याची आठवण शिंदे यांनी करून दिली. गोपाळकाला, दहीहंडी, नवरात्रोत्सव यांसह सर्व सण उत्साहात साजरे व्हावेत, ही सरकारची भूमिका राहिली आहे. छटपूजेसारख्या परंपरांनाही सरकारकडून नेहमीच प्रोत्साहन दिले जाते, असे ते म्हणाले.
यावेळी शिंदे यांनी एक मिश्किल टिप्पणी देखील केली. 'छठपूजा जोरदार साजरी झाल्याने कोरोना पळून गेला,' असे ते म्हणाले. मुख्यमंत्री झालो, त्यावेळी कोरोनामुळे सर्व सणांवर निर्बंध होते. मंदिरं बंद होती. कोरोना काही प्रमाणात कमी झाला होता. त्याचवेळी मी आधी सणांवरील निर्बंध उठवले. सर्वप्रथम गोकुळाष्टमी सण जोरदार साजरा झाला. गणपती, नवरात्रोत्सवदेखील उत्साहात साजरे झाले. छठपूजादेखील जोरदार साजरी झाल्याने कोरोना पळून गेल्याची ही टिप्पणी होती.
उत्सवस्थळी आकाशात फटाके उडवून जोरदार आतषबाजी करण्यात आली. रायलादेवी तलावापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या रहेजा गार्डन गृहसंकुलात गेल्याच आठवड्यात झालेल्या भीषण अग्नितांडवानंतर ठाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी आकाशात उडवल्या जाणाऱ्या फटाक्यांमधील रॉकेटवर बंदी घातली होती. मात्र, हे आदेश पायदळी तुडवत याठिकाणी राजकीय नेत्यांच्या समोरच फटाके उडवले गेले.
राज्यातील शेतकरी सध्या विविध संकटांचा सामना करत आहेत. अशा परिस्थितीत सर्वांनी एकजुटीने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याची गरज आहे. सरकार पूर्ण ताकदीने शेतकऱ्यांच्या सोबत असून, समाजातील प्रत्येक घटकानेही मदतीसाठी पुढे यावे. संकटाच्या काळात राजकारण न करता माणुसकी आणि सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे, असे आवाहन शिंदे यांनी केले.
छटपूजेच्या आयोजनासाठी परिश्रम घेणाऱ्या सर्व आयोजक, कार्यकर्ते आणि नागरिकांचे त्यांनी अभिनंदन केले. छटमातेचे आशीर्वाद सर्वांना लाभोत आणि प्रत्येकाच्या आयुष्यात सुख, समाधान व समृद्धी नांदो, अशा शुभेच्छा देत त्यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
M.Arya--BD