लग्नाच्या नावाखाली सायबर फसवणूक; उरणमधील तरुणीला ५.५२ लाखांचा गंडा
उरणमधील ३० वर्षीय तरुणीने लग्नासाठी योग्य जोडीदार शोधताना सायबर भामट्यांच्या जाळ्यात अडकली. मॅट्रिमोनिअल साइटवरून संपर्क साधून यूकेतील एनआरआयचा बनाव करणाऱ्या फसव्याने तब्बल पाच लाख ५२ हजार रुपये उकळले. या प्रकरणी उरण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
लग्नासाठी ऑनलाइन जोडीदार शोधणे एका तरुणीला अत्यंत महागात पडले आहे. उरणमधील ३० वर्षीय तरुणीने मॅट्रिमोनिअल वेबसाइटवरून संपर्क साधणाऱ्या सायबर भामट्यांकडून तब्बल पाच लाख ५२ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी उरण पोलिसांनी संबंधितांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
तरुणीने सप्टेंबर महिन्यात एका विवाहविषयक संकेतस्थळावर आपली नोंदणी केली होती. याचदरम्यान, 'अविराज देशपांडे' नावाने कोणीतरी व्हॉट्सॲपवर तिच्याशी संपर्क साधला. यूकेमध्ये राहत असल्याचा बनाव करून त्याने तरुणीचा विश्वास संपादन केला. ६ ऑक्टोबर रोजी तो भारतात येणार असल्याचेही त्याने सांगितले.
त्यानंतर दुसऱ्याच दिवशी 'कृतीका राय' नावाच्या व्यक्तीने तरुणीला संपर्क साधला. स्वतःला दिल्ली विमानतळावरील कस्टम अधिकारी असल्याचे भासवणाऱ्या या व्यक्तीने सांगितले की, अविराज देशपांडे याच्याकडे यूकेमधून दोन लाख पौंडचा डिमांड ड्राफ्ट आहे. मात्र, त्याची नोंदणी करण्यासाठी ५५ हजार ५०० रुपये भरावे लागतील. या माहितीवर विश्वास ठेवून तरुणीने पैसे पाठवले.
पैसे मिळाल्यानंतर फसव्यांनी वेगवेगळी कारणे सांगून तरुणीकडून अतिरिक्त रक्कम उकळण्यास सुरुवात केली. 'ॲण्टी मनी लाँड्रिंग प्रमाणपत्र', 'फॉरेन एक्स्चेंज क्लिअरन्स', कायदेशीर मालकी हस्तांतरण, आंतरराष्ट्रीय मुद्रा निधी (IMF), करन्सी डिक्लेरेशन आणि विलंब शुल्क अशा विविध नावाखाली तरुणीने वेळोवेळी पैसे पाठवले.
या प्रक्रियेत अविराज देशपांडेने २५ हजार डॉलरचे रोख रकमेचे पार्सल पाठविले असून, ते जम्मू-काश्मीर विमानतळावर कस्टम विभागाने पकडल्याचा बनाव केला. त्यानंतर 'गुरसेल' नावाच्या व्यक्तीने तरुणीला संपर्क साधून विविध प्रमाणपत्रांच्या शुल्कासाठी आणखी पैसे भरण्यास सांगितले.
लग्नाच्या भूलथापा आणि परदेशातून मोठी रक्कम मिळणार असल्याच्या प्रलोभनांना बळी पडलेल्या तरुणीने अनेक वेळा पैसे पाठवले. मात्र, पैसे पाठविल्यानंतरदेखील पार्सल मिळत नसल्याने तिला फसवणूक झाल्याचे लक्षात आले. या प्रकरणी उरण पोलिसांनी तक्रार नोंदवून कारवाई सुरू केली आहे.
L.Apte--BD