छठपूजा: जुहू समुद्रकिनाऱ्यावर वाहतूक बंद, पर्यायी मार्गांची माहिती
छठपूजेच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील जुहू समुद्रकिनाऱ्यावर भाविकांची गर्दी पाहता वाहतूक पोलिसांनी तात्पुरते वाहतूक निर्बंध लागू केले आहेत. रविवारी दुपनी दोन वाजल्यापासून सोमवारी सकाळी अकरा वाजेपर्यंत काही प्रमुख रस्ते बंद राहणार असून, पार्किंगवरही मनाई आहे. या कालावधीत पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मुंबई : छठपूजेच्या सणाला अनुसरून मुंबईतील जुहू समुद्रकिनाऱ्यावर भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता असल्याने वाहतूक पोलिसांनी तात्पुरते वाहतूक नियमन केले आहे. सांताक्रूझ वाहतूक विभागाच्या हद्दीत रविवार, १५ तारखेला दुपारी दोन वाजल्यापासून सोमवार, १६ तारखे सकाळी अकरा वाजेपर्यंत हे निर्बंध लागू राहणार आहेत. या कालावधीत काही प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार असून, इतर मार्गांवर एकेरी वाहतूक आणि पार्किंगवर मनाई लागू करण्यात आली आहे.
सांताक्रूझ पोलिस ठाणे जंक्शन ते जुहू बीच तसेच ट्युलिप स्टार हॉटेल जंक्शन ते जुहू बीच हे दोन्ही मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद राहतील. मात्र, या निर्बंधांतून पोलिस आणि आपत्कालीन सेवांच्या वाहनांना सूट देण्यात आली आहे. जुहू तारा रोडच्या दोन्ही बाजूंना तसेच ए. बी. नायर रोड, व्ही. एम. रोड, जुहू चर्च रोड आणि बिर्ला लेन येथे निर्बंधांच्या कालावधीत वाहनतळास मनाई करण्यात आली आहे.
ए. बी. नायर रोडवरून चर्च रोडमार्गे बलराज सहानी मार्गाकडे जाणाऱ्या वाहनांसाठी एकेरी वाहतूक लागू राहील. हॉटेल महाराजा भोगसमोरील यू-टर्न बंद ठेवण्यात येणार आहे. ट्युलिप स्टार हॉटेलमार्गे जुहू कोळीवाड्याकडे जाणाऱ्या वाहनचालकांना जुहू कोळीवाडा जंक्शनवरील यू-टर्नचा वापर करावा लागणार आहे.
लिंक रोडवरून येणाऱ्या वाहनांनी सांताक्रूझ पोलिस ठाणे जंक्शनवर उजवीकडे वळून स्टैंडर्ड चार्टर्ड बैंक जंक्शनवरून डावीकडे वळावे आणि एस. व्ही. रोडने पुढे जावे. ट्युलिप स्टार हॉटेलच्या दिशेने येणारी वाहने व्ही. एम. रोडने वळविण्यात येतील. तसेच एन. एस. रोड क्रमांक १३ येथे जाण्यासाठी जुहू चर्च रोड आणि अल्फ्रेडो क्रियाडो रोड या पर्यायी मार्गांचा वापर करता येणार आहे.
छठपूजेच्या काळात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहनचालकांनी वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे आणि पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन मुंबई वाहतूक पोलिसांनी केले आहे.
V.Handa--BD