बेस्ट ताफ्यात १,५०० नव्या इलेक्ट्रिक बस; पीएम ई-ड्राइव्ह योजनेअंतर्गत करार
मुंबईकरांच्या सार्वजनिक वाहतुकीचा प्रवास आणखी सुलभ आणि पर्यावरणपूरक होणार आहे. बेस्ट उपक्रमाने केंद्र सरकारच्या 'पीएम ई-ड्राइव्ह' योजनेअंतर्गत १,५०० नव्या वातानुकूलित इलेक्ट्रिक मिडी बस घेण्यासाठी दोन कंपन्यांसोबत करार केला आहे. मार्च २०२८ पर्यंत या बस ताफ्यात दाखल होतील.
मुंबई : बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात आणखी १,५०० वातानुकूलित इलेक्ट्रिक मिडी बसगाड्यांची भर पडणार आहे. या बसगाड्यांच्या पुरवठ्यासाठी आज (ता. १२) बेस्ट भवन येथे दोन कंपन्यांसोबत करार करण्यात आला.
केंद्र सरकारच्या 'पीएम ई-ड्राइव्ह' योजनेअंतर्गत भाडेतत्त्वावर या बसगाड्या उपलब्ध करून दिल्या जाणार असून, मार्च २०२७ पासून त्यांचा टप्प्याटप्प्याने समावेश करण्यात येणार आहे. मार्च २०२८ पर्यंत सर्व बसगाड्या बेस्टच्या ताफ्यात दाखल होतील.
नऊ मीटर लांबीच्या या बसगाड्यांपैकी १,०५० बसगाड्यांचा पुरवठा मेसर्स मुंबई विद्युत वाहन ऑपरेशन प्रा. लि. कंपनीकडून, तर ४५० बसगाड्यांचा पुरवठा मेसर्स साईग्रीन ईव्हीएम प्रा. लि. कंपनीकडून केला जाणार आहे. राष्ट्रीय स्पर्धात्मक निविदा प्रक्रियेद्वारे या कंपन्यांची निवड करण्यात आली आहे.
या बसगाड्यांचा वापर प्रामुख्याने मेट्रो स्थानकांपासून प्रवाशांना इच्छित स्थळी पोहोचविण्यासाठी केला जाणार आहे. मार्च २०२७ पर्यंत सुमारे २२५ बस दाखल होण्याची अपेक्षा आहे.
प्रत्येक बसमध्ये २८ प्रवाशांसाठी आसनव्यवस्था असून, दिव्यांगांसाठी व्हीलचेअरची स्वतंत्र जागा आणि स्वयंचलित रॅम्प असेल. एका चार्जिंगमध्ये या बस किमान २०० किलोमीटर धावू शकतील. तसेच आसनाजवळ यूएसबी चार्जिंगची सुविधा असेल.
G.Radhakrishnan--BD