अजय बारस्करांचा मनोज जरांगेंवर जोरदार हल्ला; ५०० कोटींच्या क्लिप आणि ३७०० कोटींच्या टेंडरचा हिशोब मागितला
मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या कार्यपद्धतीवर अजय बारस्कर यांनी जोरदार टीका केली. 'मराठा समाज भावनिक आहे, पण मूर्ख नाही,' असे म्हणत त्यांनी जरांगेंच्या निकटवर्तीयांच्या आर्थिक व्यवहारांवर प्रश्न उपस्थित केले. ५०० कोटींची क्लिप आणि ३७०० कोटींची टेंडर यांचा हिशोब मागितला आहे.
मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या कार्यपद्धतीवर आणि त्यांच्या निकटवर्तीयांच्या आर्थिक व्यवहारांवर अजय बारस्कर यांनी गंभीर आरोप केले आहेत. 'मराठा समाज भावनिक आहे, पण वेडा आणि मूर्ख नाही,' असे प्रतिपादन करताना बारस्कर म्हणाले की, सध्या मराठा आंदोलनाचा शेवट होत नसून मनोज जरांगे यांचा राजकीय अस्त होत चालला आहे. समाजाला भावनिक करण्याचा प्रयत्न करून स्वतःला वाचवण्याचा हा डाव असल्याचा आरोपही त्यांनी केला.
गेल्या तीन वर्षांत मराठा समाजाच्या पदरात नेमके काय पडले, यावरून बारस्कर यांनी प्रश्न उपस्थित केले. 'मला खायला काही नाही, चपला नाहीत आणि पाचशे रुपयांची नोट पाहिलेली नाही,' अशी वक्तव्ये किती दिवस करणार? असा सवाल त्यांनी जरांगेंला विचारला. तुमच्या पुढे-मागे फिरणारा गाड्यांचा ताफा, पायातील बूट आणि घरातील एसी हे सर्व समाजाला दिसत असल्याचे बारस्कर म्हणाले. आंदोलनासाठी राज्यभरातून आलेले तेल, तूप, धान्य, काजू-बदाम, गाद्या, कूलर आणि मंडपाचे साहित्य नेमके कुठे गेले, याचा हिशोब मागितला.
वर्गणीच्या हिशोबाबाबतही बारस्कर यांनी प्रश्न उपस्थित केले. आंदोलनासाठी मिळालेल्या देणग्यांचा हिशोब ठेवणारे सुदाम मुकणे एक रुपयाचाही हिशोब का देत नाहीत, असा सवाल त्यांनी केला. यासोबतच निकटवर्तीयांच्या संपत्तीवरून गंभीर आरोप करण्यात आले. 'मनोज जरांगेंच्या टोळीने तब्बल ३,७०० कोटी रुपयांची टेंडर घेतल्याचा आरोप आहे,' असे बारस्कर म्हणाले.
जरांगेंच्या सख्ख्या पुतण्या ओंकार स्वस्ती याने कोट्यवधींच्या जमिनी कशा खरेदी केल्या, पांडुरंग तारक यांनी २७ एकर जमीन कशी घेतली, यावरून बारस्कर यांनी प्रश्न उपस्थित केले. दुसरा पार्टनर संजय कटारे वाळू चोरी करतो, त्यावर तुम्ही का बोलत नाही, असा सवालही त्यांनी विचारला.
५०० कोटींच्या क्लिपबाबतही बारस्कर यांनी मागणी केली. 'ती क्लिप कोणी दिली त्याचे नाव जाहीर करा. अमोल खुने यांनी ही क्लिप आधी व्हायरल केली, मग त्यांचे नाव का घेत नाही?' असे म्हणत बारस्कर यांनी या क्लिपची फॉरेन्सिक तपासणी होणे आवश्यक असल्याचे सांगितले. ती खोटी निघाल्यास जरांगेंवर गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी त्यांनी केली.
विधानसभा निवडणुकीत अर्ज गोळा करून पहाटे कोणासोबत सेटिंग झाले, याबाबतही बारस्कर यांनी प्रश्न उपस्थित केले. जरांगेंच्या नेतृत्वाखालील आंदोलनाची दिशा आणि त्यातील आर्थिक व्यवहारांवरून वाद निर्माण झाला आहे. मराठा समाजातील भावनिकतेचा फायदा घेऊन राजकीय उद्देश साधण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप बारस्कर यांनी केला आहे.
C.F.Salvi--BD