माझगाव टेक्स्टाइल म्युझियमला स्थायी समितीची मंजुरी; कामगारांच्या घरांची मागणी जोर धरत
मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीने माझगाव येथील इंडिया युनायटेड मिलच्या जागेवर 'टेक्स्टाइल म्युझियम' उभारण्यासाठी आवश्यक असलेला ३.१७ कोटींचा मेट्रो उपकर भरण्यास मंजुरी दिली आहे. मात्र, या बैठकीत गिरणी कामगारांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अधिक गाजला आणि लोकप्रतिनिधींनी शिल्लक राहणाऱ्या जागेवर कामगारांसाठी घरे बांधण्याची जोरदार मागणी केली.
मुंबई : मुंबईच्या ऐतिहासिक गिरणी संस्कृतीचा आणि गिरणगावच्या दीर्घकालीन संघर्षाचा वारसा जपण्यासाठी माझगाव येथील इंडिया युनायटेड मिल (क्र. २ व ३) च्या जागेवर साकारल्या जाणाऱ्या 'टेक्स्टाइल म्युझियम'च्या प्रस्तावास अखेर हिरवा कंदील मिळाला आहे. गुरुवारी झालेल्या मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत जमीन हस्तांतरणासाठी आवश्यक असलेला १ टक्का मेट्रो उपकर (सुमारे ३.१७ कोटी रुपये) भरण्याच्या प्रस्तावास मंजुरी देण्यात आली. या निर्णयाने संग्रहालयाच्या उभारणीचा मार्ग मोकळा झाला असला, तरी बैठकीदरम्यान गिरणी कामगारांच्या पुनर्वसनाचा मुद्दा सर्वाधिक गाजला आणि प्रशासनावर जोरदार टीकेची झोड उठली.
बैठकीत लोकप्रतिनिधींनी गिरणी कामगारांच्या हक्काचा मुद्दा अत्यंत आक्रमकपणे उपस्थित केला. म्युझियमसाठी राखीव असलेल्या एकूण जागेपैकी सुमारे १० हजार चौरस मीटर (उर्वरित) भूखंडावर गिरणी कामगारांच्या कुटुंबांसाठी घरे बांधण्याची आणि त्यांच्या मुलांना नोकऱ्या उपलब्ध करून देण्याची जोरदार मागणी करण्यात आली. गिरणगावातील गिरण्या बंद पडल्यानंतर तेथे मोठे मॉल आणि टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या; मात्र, किमान या राखीव जागेत कामगारांना न्याय मिळावा, अशी भूमिका प्रशासनाला धारेवर धरताना मांडण्यात आली.
उद्धवसेनेचे यशोधर फणसे आणि रमाकांत रहाटे यांनी हा प्रस्ताव गेल्या १७ वर्षांपासून का रखडला, तसेच मेट्रो उपकर पालिकेने का भरावा, असा सवाल उपस्थित केला. तर श्रद्धा जाधव यांनी राज्य सरकारच्या देण्यांमधून उपकराची रक्कम वळती करण्याची सूचना केली. मनसेचे यशवंत किल्लेदार यांनीही संग्रहालयाव्यतिरिक्त शिल्लक राहणाऱ्या जागेच्या वापराबाबत विचारणा केली.
या प्रस्तावावर अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी स्पष्टीकरण दिले की, राज्य सरकारने पालिकेला मुद्रांक शुल्क माफ केले आहे. केवळ १ टक्के मेट्रो उपकरामुळे (३ कोटी १७ लाख रुपये) जमीन हस्तांतरण रखडले होते; त्यामुळे सध्या पालिका हा उपकर भरून जमीन आपल्या नावावर करून घेईल आणि नंतर ही रक्कम परत मिळावी यासाठी राज्य सरकारला विनंती करेल. विशेष म्हणजे, या म्युझियमचे बांधकाम जेएसडब्ल्यू (JSW) समूहाच्या सीएसआर (CSR) निधीतून होणार असल्याने बांधकामाचा आर्थिक भार पालिकेच्या तिजोरीवर पडणार नाही, असेही त्यांनी नमूद केले.
२०१६ मध्ये राज्य सरकारने ४४ हजार चौ.मी. जागा मनोरंजन मैदान व टेक्सटाइल म्युझियमसाठी आरक्षित केली होती. यापैकी ३४ हजार ५८४ चौ.मी. जागेवर संग्रहालय साकारण्यात येत आहे. राज्य सरकार, मुंबई महापालिका आणि राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाच्या (NTC) पुढाकाराने उभारल्या जाणाऱ्या या केंद्रात विविध सुविधा असतील. म्युझिकल फाउंटन आणि प्रकाश व्यवस्थेद्वारे चित्रीकरणातून मुंबई व गिरणी कामगारांच्या गौरवशाली इतिहासाचे दर्शन घडवले जाणार आहे.
या संग्रहालयात जुन्या गिरणीच्या वास्तूंचे जतन, लँडस्केपिंग, अंतर्गत रस्ते आणि कुंपण भिंतीला जीआरसी (GRC) लावून ऐतिहासिक स्वरूप आणि वारली चित्रकला यांचा समावेश असेल. गिरणी कामगारांच्या पुनर्वसनाच्या मागण्यांमुळे हा प्रस्ताव दीर्घकाळ वादात होता, परंतु आता मेट्रो उपकर भरल्याने उभारणीची प्रक्रिया वेगाने पुढे जाईल, अशी अपेक्षा आहे.
F.Mahajan--BD