सातारा: अवैध पिस्तुल प्रकरणी काँग्रेस नेत्याच्या मुलाला अटक
सातारा जिल्ह्यातील कराडमध्ये पोलिसांनी अवैध शस्त्र विक्री आणि वापराच्या प्रकरणात मोठी कारवाई केली आहे. एलसीबी आणि स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून दोन संशयितांना रंगेहात पकडले. यातील एक संशयित काँग्रेसच्या माजी कराड शहराध्यक्षाचा मुलगा असल्यामुळे या कारवाईने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
सातारा जिल्ह्यातील कराडमध्ये पोलिसांनी अवैध शस्त्र विक्री आणि वापराच्या प्रकरणात मोठी कारवाई केली आहे. एलसीबी (विशेष कार्य पथक) आणि स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्तपणे सापळा रचून दोन संशयितांना रंगेहात अटक केली. या कारवाईदरम्यान ६५ हजार रुपयांच्या किंमतीचे देशी बनावटीचे पिस्तुल जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणातील एक संशयित काँग्रेस पक्षाच्या माजी कराड शहराध्यक्षाचा मुलगा असल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक निखील पिंगळे आणि अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांनी अवैध देशी बनावटीच्या अग्निशस्त्रांची विक्री करणाऱ्यांविषयीची माहिती मिळवून तातडीने कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार एलसीबीचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांनी स्वतंत्र पथकाची रचना केली. एलसीबी आणि कराड डीबी (गुन्हे प्रकटीकरण) पथकाने शहरात पेट्रोलिंग सुरू केले होते. दरम्यान, एका संशयित तरूणाकडे अवैध देशी बनावटीचे पिस्तुल असल्याची माहिती खबऱ्याकडून मिळाली.
या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखा आणि कराड शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने पंकज हॉटेलच्या परिसरात सापळा रचला. या साळ्यात दोन संशयितांना ताब्यात घेतले गेले. अंगझडती केली असता त्यांच्याकडे देशी बनावटीचे पिस्तुल आढळून आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अवैध शस्त्र विक्रीसाठी आलेला संजू भंवरसिंह अनारे (रा. धायडी-धरणीतांडा, जि. धार, मध्यप्रदेश) आणि पिस्तुल विकत घेणारा प्रशांत प्रदीप जाधव (रा. कराड, जि. सातारा) यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्हे प्रकटीकरण शाखेचे उपनिरीक्षक निखिल मगदूम अधिक तपास करत आहेत.
या अटकेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. संशयित आरोपी प्रशांत जाधव हा काँग्रेसच्या माजी कराड शहराध्यक्षाचा मुलगा असल्याचे समोर आले आहे. पोलीस चौकशीत असे लक्षात आले की, प्रशांत जाधवचे वडील हे काँग्रेसचे कराड शहराध्यक्ष होते आणि ते एका मातब्बर राजकीय नेत्यांचे निकटवर्तीय आहेत. अवैध शस्त्र नेमके कोणत्या कारणासाठी विकत घेतले होते, याबाबत पोलिसांची चौकशी सुरू आहे. मात्र, अटकेतील संशयिताचा राजकीय पार्श्वभूमीमुळे या प्रकरणाची चर्चा राजकीय वर्तुळात जोरात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केवळ फॅशन किंवा मिरवण्यासाठी पिस्तूल बाळगणे हा गंभीर गुन्हा आहे. सध्या तरूणांमध्ये सोशल मीडियावर रिल्स बनवण्यासाठी, लग्नसमारंभात किंवा सार्वजनिक ठिकाणी शस्त्रांचे प्रदर्शन करण्याचा एक प्रकार पसरला आहे. अनेक तरूण थेट तुरुंगाची पायरी चढायची वेळ येईल हे माहीत असतानाही या गुन्ह्यात अडकतात.
भारतीय कायद्यानुसार, कोणतेही अग्निशस्त्र (पिस्तूल किंवा रिव्हॉल्व्हर) बाळगण्यासाठी वैध परवाना असणे अनिवार्य आहे. केवळ स्वसंरक्षणासाठी ठोस कारण असेल, तरच पोलीस चौकशीनंतर हा परवाना दिला जातो. विनापरवाना पिस्तूल किंवा देशी बनावटीचे कट्टे बाळगल्यास ३ ते ७ वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि दंडाची शिक्षा होऊ शकते. जर शस्त्र प्रतिबंधित प्रकारचे असेल, तर जन्मठेपेपर्यंत देखील शिक्षा होऊ शकते. कायद्यातील या कडक तरतुदींबद्दल अनेकांना माहिती नसल्यामुळे ते अवैध शस्त्रांच्या मोहात फसून तुरूंगात जातात, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
P.Raval--BD