रोहिणी हट्टंगडी यांचा सिनेमा आणि समाजातील हिंसाचारावरून सवाल
ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांनी आपल्या पाच दशकांच्या कारकिर्दीत रंगभूमी, मालिका आणि चित्रपट अशा विविध माध्यमांमध्ये अभिनयाचे नवे मापदंड प्रस्थापित केले आहेत. सध्या त्या 'मीठे में क्या है' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आल्या असून, यानिमित्ताने झालेल्या संवादात त्यांनी आजच्या चित्रपटांमधील हिंसाचाराचे प्रमाण वाढल्याची आणि चांगल्या आशयाची कमतरता जाणवत असल्याची खंत व्यक्त केली.
ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांनी पाच दशकांहून अधिक काळाच्या प्रदीर्घ कारकिर्दीत रंगभूमी, दूरदर्शन मालिका आणि चित्रपट अशा विविध कला माध्यमांमध्ये अभिनयाचे नवे मापदंड निर्माण केले आहेत. ऑस्कर विजेत्या 'गांधी' या चित्रपटातील कस्तुरबा गांधी यांच्या भूमिकेसाठी त्यांना बाफ्टा पुरस्कार मिळाला, ज्यामुळे त्या एकमेव भारतीय अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात. तसेच, कन्नडमधील यक्षगान आणि जपानी काबुकी रंगभूमीवर सादरीकरण करणाऱ्या पहिल्या महिला कलाकारांपैकी एक असलेल्या रोहिणी हट्टंगडी यांनी विविध धाटणीच्या चित्रपटांतून आपल्या अभिनयाचे वेगवेगळे पैलू प्रेक्षकांसमोर आणले आहेत. बदलत्या काळानुसार स्वतःमध्ये बदल घडवून आणणे गरजेचे असल्याचे त्या मानतात, मात्र आजच्या चित्रपटांमध्ये चांगल्या आशयाची कमतरता जाणवत असल्याची खंतही त्या व्यक्त करतात.
रोहिणी हट्टंगडी सध्या राधिका बन्सल या नवोदित दिग्दर्शिकेच्या 'मीठे में क्या है' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. रिचर्ड अॅटनबरो, बेन किंग्जले आणि श्याम बेनेगल यांसारख्या दिग्गजांसोबत काम केलेल्या त्या नव्या कलाकारांसोबत सहकलाकार म्हणून काम करताना आपल्या भूमिकेबद्दल स्पष्टपणे बोलल्या. 'माझ्यासाठी सहकलाकार हा नेहमी सहकलाकारच असतो. तो माझ्यापेक्षा श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नसतो,' असे म्हणत त्यांनी राष्ट्रीय नाट्य विद्यालयातील (एनएसडी) आपल्या गुरू इब्राहिम अल्काझी यांच्या आठवणींना उजाळा दिला. एनएसडीमध्ये एकदा गुरूंनी आम्हाला एका नाटकातील समूहदृश्यासाठी स्वतःची व्यक्तिरेखा लिहायला सांगितले होते. त्यावेळी आम्ही विचारले की, आम्ही तर गर्दीचा भाग आहोत, मग आमची व्यक्तिरेखा काय असेल? तेव्हा गुरूंनी विचारले की, समूहदृश्यात तुम्ही नेमके काय करत आहात? तुम्ही भिकारी असाल, तरी काहीतरी करतच असाल ना?' या प्रसंगानंतर रोहिणी हट्टंगडी म्हणाल्या, 'सेटवर असलेला प्रत्येक कलाकार हा एक स्वतंत्र व्यक्तिरेखा असतो. संघर्षाच्या काळात मोठ्या कलाकारांसमोर उभी राहायचे, तेव्हाही आपणही काहीतरी करत आहोत, असा माझा विचार असायचा. अर्थात, मनातून भीती वाटत असायचीच. आज माझ्यासमोर एखादा नवोदित कलाकार असला, तरी मी त्याच्याकडे समानतेनंच पाहते.'
अनेक उल्लेखनीय कामगिरी रोहिणी यांच्या नावावर आहेत, मात्र हे सगळे करताना कोणताही नवा विक्रम प्रस्थापित करण्याचा किंवा एखादी प्रथा मोडण्याचा विचार मनात नव्हता, असे त्या स्पष्ट करतात. 'मी यक्षगान केले, तेव्हा डॉ. शिवराम कारंथ एनएसडीमध्ये आले होते. आम्हाला यक्षगानाचं प्रशिक्षण देण्यासाठी आणि दिग्दर्शन करण्यासाठी ते आले होते. योगायोगानं मी यक्षगान सादर करणारी पहिली महिला ठरले. कारण त्याआधी सार्वजनिक प्रयोगांमध्ये पुरुष कलाकारच स्त्रीच्या भूमिका साकारत असत,' असे सांगत त्यांनी पुढे म्हटले की, 'मी कोणतीही प्रथा मोडण्यासाठी हे केलं नव्हतं. इबाराकी काबुकीमध्येही पुरुष कलाकार स्त्रीच्या भूमिका साकारत असत. तिथेही मी सादरीकरण करणारी आशियातील पहिली महिला ठरले. मात्र, या गोष्टी करताना इतिहास घडवण्याचा किंवा विक्रम करण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता.'
नव्या गोष्टींशी जुळवून घेण्याचा प्रयत्न सुरू असला तरी, आजच्या चित्रपटांमध्ये आशयाची कमतरता जाणवते. कारण सध्या चित्रपटांमध्ये हिंसाचाराचे प्रमाण वाढले आहे. अशा प्रकारचे चित्रपट अधिक चालतात आणि त्यातून पैसेही मिळतात, पण हे प्रमाण कमी व्हायला हवे, असे रोहिणी हट्टंगडी यांचे मत आहे. 'चित्रपट हे समाजाचं प्रतिबिंब असते. सध्या लोकांमधला राग वाढला आहे. निराशा आणि हताश होणंही वाढलंय. हे सगळं थोडं कमी झालं, तर अधिक चांगलं होईल. सिनेमा आणि समाज या दोन्हीकडील हिंसा कमी व्हायला हवी!' असे त्यांनी स्पष्टपणे नमूद केले.
जागतिक चित्रपटसृष्टीत महत्त्वाचं स्थान असलेल्या 'गांधी' चित्रपटातील कस्तुरबा गांधी यांच्या भूमिकेबद्दलही त्यांनी आठवणींना उजळा दिला. 'गांधी' चित्रपट करताना माझ्यासाठी एक गोष्ट अनुकूल ठरली. कस्तुरबा गांधी यांना लोकांनी फारसं पाहिलेलं नव्हतं. कदाचित त्यामुळेच प्रेक्षकांनी मला त्या भूमिकेत स्वीकारलं असावं,' असे म्हणत त्यांनी सांगितले की, 'या भूमिकेसाठी आम्हाला स्वतः खूप अभ्यास करावा लागला. सर रिचर्ड अॅटनबरो यांनी बसून आम्हाला प्रत्येक गोष्ट समजावून सांगितली नव्हती. स्वतःची तयारी आणि अभ्यास आम्हालाच करायचा होता. त्यामुळे मीही माझा अभ्यास केला. राष्ट्रीय नाट्य विद्यालयातील प्रशिक्षणाचा यासाठी मला नक्कीच फायदा झाला आणि ही तयारी करणं तुलनेनं सोपं गेलं.'
M.T.Johanson--BD