गोकुळ अध्यक्षपदाची निवडणूक उद्या; शासननियुक्त संचालकांची मते वेगळी ठेवण्याचा हायकोर्टाचा आदेश
कोल्हापूर दूध संघ म्हणजे गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून निर्माण झालेल्या वादावर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने आज महत्त्वपूर्ण आदेश दिले आहेत. या आदेशानुसार, गोकुळच्या अध्यक्षपदासाठी उद्या 10 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. सर्व संचालकांसह शासननियुक्त चार संचालकांनाही मतदानाचा अधिकार मिळाला असला तरी, त्यांची मते वेगळी ठेवण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.
छत्रपती संभाजीनगर: कोल्हापूर दूध संघ म्हणजे गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत निर्माण झालेल्या पेचावर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठासमोर आज सुनावणी पार पडली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर खंडपीठाने महत्त्वपूर्ण आदेश दिले आहेत. राज्य सरकारने जारी केलेल्या अध्यादेशाला स्थगिती देण्याची मागणी न्यायालयाने फेटाळली आहे.
न्यायालयाच्या आदेशानुसार, गोकुळच्या अध्यक्षपदासाठी उद्या 10 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत निवडून आलेले 25 सदस्य आणि शासनाने नियुक्त केलेले 4 संचालक असे एकूण 29 संचालक मतदान करतील. विशेष म्हणजे, शासननियुक्त चार संचालकांना देखील मतदान करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, या चार संचालकांची मते वेगळी ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. त्यानुसार ही मते स्वतंत्रपणे जतन केली जाणार आहेत.
संपूर्ण निवडणूक प्रक्रियेची व्हिडिओग्रफी करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत. निकाल जाहीर केला जाईल आणि अध्यक्षपदाची निवड होईल. राज्य शासनाच्या अध्यादेशाबाबत त्याचा बरोबर की चूक हे अद्याप ठरलेले नाही, परंतु सध्या निवडणूक घेण्याचे आदेश दिले आहेत.
या प्रकरणाची पुढील सुनावणी 25 नोव्हेंबर रोजी होईल, असे न्यायालयाने जाहीर केले आहे. संपूर्ण निवडणुकीची प्रक्रिया अंतिम निकालाच्या अधीन असेल, हेही स्पष्ट करण्यात आले आहे.
X.Badami--BD