पुणे आणि पिंपरीत दिवाळीनंतर प्रदूषणाची गंभीर स्थिती; हवेचा दर्जा 'वाईट' श्रेणीत
दिवाळीच्या शुभ्र सणानंतर पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये हवेची गुणवत्ता गंभीरपणे ढासळली आहे. लक्ष्मी पूजनादरम्यान वाजवलेल्या फटाक्यांच्या धुरामुळे अतिसूक्ष्म धूलिकणांचे प्रमाण लक्षणीय वाढले असून, शिवाजीनगर, हडपसर आणि कात्रजसह अनेक भागांमध्ये धुरके (स्मॉग) दिसून आला आहे. यामुळे नागरिकांना श्वसनाचा त्रास होत आहे.
दिवाळीच्या पहिल्या तीन दिवसांच्या निरीक्षणांमध्ये शहरातील हवेची गुणवत्ता गंभीरपणे ढासळली आहे. रविवारी संध्याकाळी लक्ष्मी पूजनाच्या निमित्ताने वाजवलेल्या फटाक्यांच्या धुरामुळे ही स्थिती आणखी बिघडली. मध्यवर्ती पुण्यासह उपनगरांमध्येही उडविल्या गेलेल्या आवाजी फटाक्यांचा आणि आकाशात भरपूर प्रकाश करणाऱ्या फटाक्यांमुळे चौफेर धुराचे लोट आणि धुरके (स्मॉग) दिसून आला. पुण्यापेक्षाही जास्त वाईट हवा पिंपरी-चिंचवडमध्ये नोंदविण्यात आली.
न्यायालयाच्या आदेशानंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी) आणि स्थानिक प्रशासनाने सार्वजनिक ठिकाणी व शांतता क्षेत्रात फटाके वाजविण्यावर निर्बंध घातले आहेत. गेल्या महिनाभरापासून प्रशासकीय पातळीवर जनजागृतीपर उपक्रमातून ध्वनी आणि वायू प्रदूषण टाळण्यासाठी मोठ्या आवाजाचे, भरपूर धूर करणारे फटाके वाजविणे टाळावे, असे आवाहन करण्यात येत होते. मात्र, पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये लक्ष्मी पूजनाच्या संध्याकाळी सहा वाजतापासून रात्री दहा वाजेपर्यंत फॅन्सी प्रकारातील फटाके चौफेर वाजवले गेले.
याचा परिणाम म्हणून श्वसनासाठी घातक असलेल्या अतिसूक्ष्म धूलिकणांचे (PM2.5) हवेतील प्रमाणात लक्षणीय वाढ झाली. हवा स्थिर असल्याने आकाशातील धूर त्याच परिसरात रेंगाळला, ज्यामुळे सगळीकडे धुरकट वातावरण बघायला मिळाले. शिवाजीनगर, हडपसर, कात्रज परिसर आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये धुरकट हवा आणि स्मॉग दिसून आला.
भारतीय उष्णदेशीय हवामानशास्त्र संस्थेच्या ‘सफर’ विभाग आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे दररोज हवेच्या गुणवत्तेच्या नोंदी घेतल्या जातात. दिवाळीच्या पहिल्या तीन दिवसांच्या निरीक्षणांमध्ये आठ नोव्हेंबरला सर्वाधिक वायू प्रदूषण नोंदवले गेले. काही भागात हवेची गुणवत्ता ‘मध्यम’, तर काही ठिकाणी ती ‘वाईट’ होती. सायंकाळी सातनंतर हवा खराब झाल्याने अनेक नागरिकांना सर्दी, शिंका येणे, खोकला आणि श्वास घेण्यास त्रास होत आहे.
दिल्लीतील स्थिती अधिक गंभीर आहे. दिल्लीतील हवा गुणवत्तेत रविवारी सकाळी तीव्र घसरण झाली. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (सीपीसीबी) आकडेवारीनुसार, सकाळी ८:१० वाजता एकूण हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) ४८३वर पोहोचत ‘गंभीर’ श्रेणीत गेला. राष्ट्रीय राजधानीतील अनेक भागांत प्रदूषणाची पातळी ४००हून अधिक नोंदली गेली.
प्रदूषण पातळीत आणखी वाढ होण्याच्या भीतीमुळे, दिवाळीच्या दोन दिवस आधी शुक्रवारी हवा गुणवत्ता व्यवस्थापन आयोगाने (सीएक्यूएम) दिल्ली-एनसीआरमध्ये ‘ग्रेडेड रिस्पॉन्स ॲक्शन प्लॅन’चा तिसरा टप्पा लागू केला होता. त्यानंतर हवा गुणवत्तेत ही घसरण नोंदली गेली.
P.Raval--BD