मध्य रेल्वेवर चेन पुलिंगच्या सहा घटना; वेळापत्रक कोलमडले
दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे प्रवासी गर्दी वाढलेली असतानाच मध्य रेल्वेवर चेन पुलिंगच्या सहा घटना घडल्या. पाच मेल-एक्स्प्रेस आणि एक लोकल गाडी थांबवण्यात आल्याने रेल्वेचे वेळापत्रक विस्कळित झाले आहे. या घटनांमुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.
मुंबई: दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी वाढलेली असतानाच मध्य रेल्वेवर चेन पुलिंगच्या सहा घटना घडल्या. पाच मेल-एक्स्प्रेस आणि एका लोकलमध्ये चेन पुलिंग झाल्याने रेल्वेचे वेळापत्रक विस्कळित झाले. या घटनांमुळे संबंधित गाड्या थांबवाव्या लागल्या. त्याचा परिणाम मागून येणाऱ्या लोकल आणि मेल-एक्स्प्रेस गाड्यांवरही झाला.
गोदान एक्स्प्रेसमध्ये चेन पुलिंग झाल्याने ही गाडी दुपारी १२.०७ ते १२.१६ या वेळेत कल्याण स्थानकात थांबवण्यात आली. त्यानंतर रेल्वे पवन एक्स्प्रेसमध्ये चेन पुलिंग झाल्याने ही गाडी दुपारी १२.४३ ते १२.५३ या वेळेत कल्याण स्थानकातील फलाट क्रमांक चारवर थांबली. उद्यान एक्स्प्रेसमध्येही चेन पुलिंग करण्यात आले.
लोकमान्य टिळक टर्मिनस-आझमगड सुपरफास्ट एक्स्प्रेसमध्ये चेन पुलिंग झाली. लोकमान्य टिळक टर्मिनस-मऊ एक्स्प्रेसमध्येही चेन पुलिंग झाल्याने ही गाडी दुपारी १२.३४ ते १२.४७ या वेळेत कल्याण ते शहाडदरम्यान थांबली. टिटवाळा-सीएसएमटी लोकलमध्ये चेन पुलिंग झाल्याने ही गाडी सकाळी ९.१८ ते ९.२२ या वेळेत विद्याविहार ते कुर्लादरम्यान थांबवण्यात आली.
इंजिन बिघडल्याने मालगाडी रखडली रे रोड स्थानकाजवळील मुंबई पोर्ट ट्रस्टच्या मालगाडीचे इंजिन सोमवारी (ता. १) पहाटे ५.५० वाजता बिघडल्याने तब्बल पाच तास ही मालगाडी एकाच ठिकाणी उभी राहिली. परिणामी येथील स्थानिक रहिवाशांसह प्रवाशांना जीव मुठीत घेऊन बंद मालगाडीवर चढून उड्या मारून पूर्व व पश्चिम भागात ये-जा करीत प्रवास करावा लागला. दारू खाना, शिवडी गाडी अड्डा, ब्रिटानिया बिस्कीट कंपनी या परिसरात वास्तव्य करणाऱ्या नागरिकांना व रेल्वे प्रवाशांना ये जा करण्यासाठी एकमेव मार्ग असलेल्या मुंबई पोर्ट ट्रस्टचा रेल्वे रूळ ओलांडावा लागतो.
पश्चिम रेल्वेची सेवा ठप्प दिवाळीतील फटाक्यांच्या आतषबाजीमुळे मुंबई शहर आणि उपनगरांत आगीच्या अनेक दुर्घटना घडल्या. या आगींचा फटका आता पश्चिम रेल्वेच्या उपनगरी वाहतुकीलाही बसला आहे. नालासोपारा-विरारदरम्यान रेल्वे मार्गालगतच्या सुक्या गवताला रविवारी (ता. ८) रात्री आग लागून सिग्नल यंत्रणेच्या केबल जळाल्या. त्यामुळे या विभागातील अनेक ट्रॅक सर्किट निकामी झाली. परिणामी विरारहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या लोकल गाड्यांचे वेळापत्रक विस्कळित झाले. सोमवारी सकाळी कामावर जाण्याच्या गर्दीच्या वेळी लोकलचा वेग मंदावल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. काही लांब पल्ल्याच्या गाड्यांनाही या तांत्रिक बिघाडाचा फटका बसला.
P.Mueller--BD