विनोद कांबळींच्या आर्थिक आणि वैद्यकीय मदतीची जबाबदारी एकनाथ शिंदे यांनी स्वीकारली
प्रकृतीच्या समस्या आणि आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी यांच्या मदतीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे सरसावले आहेत. मुंबईतील नंदनवन निवासस्थानी झालेल्या भेटीत शिंदे यांनी कांबळींच्या संपूर्ण वैद्यकीय खर्चाची आणि दोन्ही मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी स्वतः घेतली आहे. या निर्णयाने कांबळी कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे.
प्रकृतीच्या समस्या आणि आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या टीम इंडियाचे माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी यांच्या मदतीसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा एकदा पुढे सरसावले आहेत. विनोद कांबळी यांनी शनिवारी, २८ नोव्हेंबर रोजी आपल्या संपूर्ण कुटुंबासह मुंबईतील 'नंदनवन' निवासस्थानी एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान उपमुख्यमंत्री शिंदे यांनी कांबळी यांच्या प्रकृतीची आणि सद्यस्थितीची विचारपूस केली. त्यानंतर, कांबळी यांच्या संपूर्ण औषधोपचारांचा तसेच दोन्ही मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याची जबाबदारी शिंदे यांनी स्वतः स्वीकारली आहे.
कांबळी यांच्यावर ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात वैद्यकीय उपचार केले जाणार आहेत. डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि शिवसेनेच्या वतीने त्यांना तातडीने सर्व आवश्यक सहकार्य करण्यात येईल, असे आश्वासन यावेळी देण्यात आले. भेटीबाबत माहिती देताना शिवसेना नेते आनंद दुबे यांनी सांगितले की, नदीम सरांनी विनोद कांबळी यांची प्रकृती गेल्या काही दिवसांत ठीक नसल्याचा आणि मुलांच्या शिक्षणाचा विषय मांडताच एकनाथ शिंदे यांनी एका सेकंदाचाही विचार न करता मदतीचा हात पुढे केला.
शिंदेंनी कांबळी कुटुंबाला मोठा आधार दिला आहे. आजपासून कांबळी यांच्या सर्व औषधोपचारांची आणि आरोग्याची काळजी शिंदे कुटुंब व शिवसेना कुटुंब घेईल, तसेच त्यांच्या दोन्ही मुलांच्या शिक्षणात कोणतीही अडचण येऊ देणार नाही, अशी ग्वाही शिंदेंनी दिली. यासोबतच मुलांनी मन लावून शिकावे आणि वडिलांचे नाव उज्ज्वल करावे, असा संदेश त्यांनी कांबळी यांच्या मुलांना दिला.
नव्वदच्या दशकात आपल्या आक्रमक फलंदाजीने भारतीय क्रिकेटविश्वात वेगळी ओळख निर्माण करणारे विनोद कांबळी गेल्या काही वर्षांपासून आजारपण आणि मर्यादित उत्पन्नाच्या साधनांमुळे आर्थिक अडचणींचा सामना करत आहेत. अलिकडेच त्यांचा एका आश्रमातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने क्रिकेटप्रेमींकडून चिंता व्यक्त केली जात होती.
यापूर्वी डिसेंबर २०२४ मध्येही कांबळी रुग्णालयात दाखल असताना एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी ५ लाख रुपयांची आर्थिक मदत केली होती. आता संपूर्ण उपचार आणि मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारल्याने कांबळी कुटुंबाला मोठा आधार मिळाला आहे.
G.Tara--BD