पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर उपाय: १० कोटींचा दंड आणि १० वर्षांची शिक्षा
महाराष्ट्रातील शासकीय भरती परीक्षांमधील पेपरफुटी आणि संघटित गैरप्रकार रोखण्यासाठी राज्य सरकारने कठोर कायदेशीर उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला आहे. उच्चस्तरीय समितीने सादर केलेल्या दुसऱ्या अंतरिम अहवालात पेपरफुटी करणाऱ्यांवर किमान १० कोटी रुपयांचा दंड आणि ७ ते १० वर्षांची कारावास शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय विशेष न्यायालये स्थापन करून खटल्यांचा जलद निपटारा करण्याच्या शिफारसीही समितीने केल्या आहेत.
महाराष्ट्रातील शासकीय भरतीसाठीच्या स्पर्धा परीक्षांमधील पेपरफुटी, संघटित गैरप्रकार आणि परीक्षा प्रक्रियेतील भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी राज्य सरकारने कठोर कायदेशीर उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतच्या शिफारसी सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव व्ही. राधा यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीने मांडल्या आहेत. समितीने राज्य सरकारला सादर केलेल्या दुसऱ्या अंतरिम अहवालात पेपरफुटीच्या संघटित गुन्ह्यांमध्ये सहभागी व्यक्ती आणि संस्थांसाठी कठोर शिक्षेची तरतूद करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
समितीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हा अहवाल सादर केला असून, पेपरफुटीच्या प्रकरणांमध्ये सहभागी व्यक्तींना किमान ७ ते १० वर्षांचा कारावास आणि किमान १० कोटी रुपयांचा दंड करण्याची शिफारस केली आहे. याशिवाय, गैरप्रकारामुळे झालेल्या नुकसानभरपाईची वसुली आणि दोषींची मालमत्ता जप्त करण्याच्या तरतुदी कायद्यात अधिक स्पष्ट करण्याचेही समितीने सुचवले आहे. सध्याच्या कायद्यानुसार संघटित गैरप्रकारांसाठी ५ ते १० वर्षांचा कारावास आणि किमान एक कोटी रुपयांचा दंड आहे, परंतु समितीने दंडाची मर्यादा थेट १० कोटी रुपये करण्याचा प्रस्ताव मांडला आहे.
परीक्षा गैरप्रकारात सहभागी सेवा पुरवठादार संस्थांवरही कडक कारवाई करण्याच्या शिफारसी समितीने केल्या आहेत. अशा संस्थांवर एक कोटी रुपयांपेक्षा जास्त दंड आकारला जाऊन त्यांना आठ वर्षांसाठी बंदी घालण्याचा प्रस्ताव आहे. तसेच, या संस्थांच्या संचालक आणि जबाबदार व्यक्तींनाही कठोर शिक्षेच्या कक्षेत आणले जाणार आहे. अनुचित साधनांचा वापर करणाऱ्या उमेदवारांसाठीही शिक्षेची मर्यादा वाढवण्यात आली आहे. सध्या तीन ते पाच वर्षांची शिक्षा असल्याचे नियम आहेत, परंतु समितीने पाच ते दहा वर्षांचा कारावास आणि ५० लाख रुपयांपर्यंतचा दंड प्रस्तावित केला आहे.
गैरप्रकारांचा तपास वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे सोपवण्याची शिफारस समितीने केली आहे. जिल्ह्यांमध्ये अतिरिक्त पोलीस अधीक्षक आणि पोलिस आयुक्तालय क्षेत्रात पोलिस उपायुक्त दर्जाचा अधिकारी हा तपास करेल. गंभीर प्रकरणांसाठी स्वतंत्र विशेष कृती दल (एसटीएफ) स्थापन करण्याचेही समितीने सुचवले आहे. पेपरफुटीच्या प्रकरणांचा जलद निपटारा करण्यासाठी विशेष जलदगती न्यायालय स्थापन करावे, अशी शिफारस केली आहे. जुन्या प्रलंबित खटल्यांचाही तीन महिन्यांत निकाल लावण्याचा उद्देश या निर्णयामागे आहे.
उमेदारांना आर्थिक दिलासा देण्यासाठी आणि परीक्षेची विश्वासार्हता वाढवण्यासाठी काही महत्त्वपूर्ण शिफारसी करण्यात आल्या आहेत. गैरप्रकार झाल्यास संपूर्ण परीक्षा शुल्क उमेदारांना परत करण्याचा विचार एमपीएससीने करावा, अशी शिफारस समितीने केली आहे. उत्तरतालिकेवरील उमेदाराचा आक्षेप योग्य ठरल्यास आक्षेपासाठी भरलेले शुल्कही परत मिळावे, असे सुचवण्यात आले आहे. तसेच, दोषींची जमीन, इमारती, जंगम मालमत्ता, बौद्धिक संपदा तसेच डिजिटल व आभासी मालमत्ता जप्त करण्यासाठी कायद्यातील तरतुदी अधिक स्पष्ट करण्याचे समितीने सुचवले आहे.
भरती प्रक्रियेतील अनिश्चितता दूर करण्यासाठी वेळापत्रकाबाबतही कठोर नियमांचा प्रस्ताव आहे. आयोगाने दरवर्षी ऑक्टोबरपर्यंत पुढील वर्षाचे वार्षिक परीक्षा वेळापत्रक जाहीर करावे, अशी शिफारस समितीने केली आहे. नियुक्ती प्राधिकरणाने सप्टेंबरअखेर रिक्त पदांची मागणी आयोगाकडे पाठवावी, यासाठी 'इंटिग्रेटेड रिक्विझिशन पोर्टल' विकसित करावा, असे समितीने म्हटले आहे. यामुळे भरती प्रक्रियेतील गोंधळ आणि उशीर टाळता येईल.
परीक्षा केंद्रांमध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीने नवीन यंत्रणा राबवण्याचाही प्रस्ताव आहे. स्वतंत्र 'व्हेन्यू बँक' तयार करणे आवश्यक असून, एमपीएससी मुख्यालय, जिल्हास्तर आणि प्रत्यक्ष परीक्षा केंद्र अशा तीन स्तरांवर परीक्षा नियंत्रण केंद्र उभे केले जातील. यामुळे सतत परीक्षा प्रक्रियेवर देखरेख ठेवून संशयास्पद प्रकारांवर लगेच कारवाई करता येईल.
तंत्रज्ञानाचा वापर करून गैरप्रकार रोखण्यासाठीही समितीने महत्त्वपूर्ण शिफारसी केल्या आहेत. सूक्ष्म संवाद उपकरणे, परिधान करण्यायोग्य कॅमेरे आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी महा-सायबरच्या मदतीने स्वतंत्र तंत्रज्ञान व सायबर सुरक्षा कक्ष स्थापन करण्याचा प्रस्ताव आहे. मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी नियुक्त करून आयोगाच्या सर्व डिजिटल प्रणालींसाठी एकात्मिक माहिती सुरक्षा धोरण तयार करण्याचेही सुचवण्यात आले आहे.
उमेदारांच्या सोयीसाठी आधारद्वारे एकदाच नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव आहे. महाआयडी किंवा आधारद्वारे वन टाइम रजिस्ट्रेशन केल्यास प्रत्येक अर्जासोबत प्रमाणपत्रे पुन्हा अपलोड करण्याची गरज राहणार नाही. परीक्षा शुल्क परतावाही आधारसंलग्न बँक खात्यात थेट जमा करता येईल, यामुळे आर्थिक व्यवहार अधिक पारदर्शक होतील.
राज्य सरकारने या शिफारसी स्वीकारून त्यासंबंधीचे शासन निर्णय लवकरच काढण्याची तयारी दर्शविली आहे. या कठोर उपाययोजनांमुळे पेपरफुटी आणि गैरप्रकारांना आळा बसेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
R.Khurana--BD