गुजरातमध्ये भाजप नेत्याच्या घरातून ६४५ बाटल्या दारू जप्त; अटक
दारूबंदी असलेल्या गुजरातमध्ये सत्ताधारी भाजपच्या स्थानिक नेत्याच्या घरातून मोठ्या प्रमाणात दारू सापडली आहे. सूरत पोलिसांनी विजय मोदी यांच्या घरावर छापा टाकून ६४५ बाटल्या जप्त केल्या असून त्यांना अटक करण्यात आली आहे. यामुळे भाजपला नामुष्की ओढावली आहे.
दारूबंदी असलेल्या गुजरात राज्यात सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) स्थानिक नेत्याच्या घरातून दारूच्या बाटल्या सापडल्या आहेत. या प्रकरणात सूरत पोलिसांनी भाजपचे महामंत्री विजय मोदी आणि त्यांचा साथीदार करण पानवाला यांना अटक केली आहे. ही घटना गुजरातमधील दारूबंदी धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी असून सत्ताधारी पक्षासाठी नामुष्कीचा विषय ठरली आहे.
सूरत शहरातील लालगेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खांड बाजार येथील एसएमसी पार्किंगच्या मागे असलेल्या लक्ष्मीभवन इमारतीच्या पहिल्या मजल्यावर विजय मोदी आणि त्यांचा मुलगा राज मोदी राहत आहेत. गस्तीवर असलेल्या सर्विलान्स पथकाला या दोघांनी परदेशी बनावटीची दारू साठवून विक्री केल्याची खात्रीपूरक टिप मिळाली होती. ही माहिती लालगेट पोलीस ठाण्याचे प्रभारी एच. जे. सोळंकी यांना देण्यात आली.
माहितीच्या आधारे पोलिसांनी घटनास्थळी धाड टाकली. तेव्हा घराच्या जिन्यावर दारूची पॅकिंग सुरू असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. तातडीने घरी प्रवेश करून झडती घेतली असता, वेगवेगळ्या ब्रँडच्या एकूण ६४५ बाटल्या दारू सापडल्या. या दारूचे बाजारमूल्य अंदाजे २ लाख ६५ हजार ५१९ रुपये इतके आहे. याशिवाय, पोलिसांनी घरातून दोन मोबाईल जप्त केले आहेत, ज्यांची किंमत सुमारे ३५ हजार रुपये आहे. अशा प्रकारे हस्तगत केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत ३ लाख ५१९ रुपये इतकी झाली.
विजय मोदी (वय ६२) हे सूरतमधील प्रभाग क्रमांक २१ चे भाजप महामंत्री आहेत. त्यांच्यासोबत अटक करण्यात आलेला करण पानवाला (वय २९) हा हिरा कारागीर आहे. पोलिसांच्या चौकशीत असे समोर आले की, मोदी पिता-पुत्रांना दारूच्या पॅकिंग आणि विक्रीमध्ये पानवाला मदत करत होता. घटनास्थळी उपस्थित असलेल्या विजय मोदीचा मुलगा राज मोदी पोलिसांच्या छापा टाकण्यापूर्वीच फरार झाला आहे. त्याच्या शोधासाठी पोलिसांनी त्याला वॉण्टेड घोषित केले आहे.
गुजरात दारूबंदी कायद्याच्या अंतर्गत विजय मोदी, करण पानवाला आणि फरार असलेल्या राज मोदी यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. भाजपशासित गुजरातमध्ये दारूबंदी असतानाच पक्षाच्या नेत्याच्या घरातून इतक्या मोठ्या प्रमाणात दारू सापडल्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे.
या अटकेची बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर भाजपनेही प्रतिक्रिया दिली आहे. सूरत शहराचे भाजप अध्यक्ष परेश पटेल यांनी विजय मोदी यांना कारणे दाखवा नोटिस बजावली आहे. मोदी यांना सात दिवसांच्या आत या नोटिशीला उत्तर देणे बंधनकारक आहे. ही घटना गुजरातमधील दारूबंदीच्या अंमलबजावणीवर प्रश्न उपस्थित करणारी असल्याचे राजकीय विश्लेषकांकडून म्हटले जात आहे.
P.Mueller--BD