महाराष्ट्रात ३,८३२ अंगणवाड्यांचे रूपांतर 'स्मार्ट' केंद्रांमध्ये; ई-लर्निंग आणि आधुनिक सुविधांची घोषणा
महाराष्ट्र सरकारने राज्यातील ३,८३२ अंगणवाडी केंद्रांचे रूपांतर 'स्मार्ट अंगणवाडी'मध्ये करण्यास मान्यता दिली आहे. महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिली. ई-लर्निंग, स्वच्छता किट आणि आधुनिक सुविधांसह या केंद्रांचे आधुनिकीकरण टप्प्याटप्प्याने केले जाईल.
मुंबई: महाराष्ट्रातील ३,८३२ अंगणवाडी केंद्रांचे रूपांतर 'स्मार्ट अंगणवाडी'मध्ये करण्यास महिला व बालकल्याण विभागाने अधिकृत मान्यता दिली आहे. या उपक्रमाअंतर्गत या केंद्रांमध्ये ई-लर्निंग सुविधा, स्वच्छता किट, वॉटर प्युरिफायर आणि आधुनिक स्वयंपाकघरासह विविध आधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. याबाबतची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.
या निर्णयामागे अंगणवाडी केंद्रांमधून मिळणाऱ्या सेवांचा दर्जा उंचावण्याचा हेतू आहे. सध्या अंगणवाडी केंद्रांमधून सहा वर्षांपर्यंतच्या बालकांना पोषण, आरोग्य आणि पूर्वप्राथमिक शिक्षणाच्या सेवा दिल्या जातात. त्याचबरोबर गर्भवती महिला आणि स्तनदा मातांनाही पोषण व आरोग्यविषयक सुविधा पुरवल्या जातात. बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी सुरक्षित, स्वच्छ आणि आनंददायी वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने 'स्मार्ट अंगणवाडी' ही संकल्पना राबविण्यात येत आहे.
या उपक्रमासाठी शासकीय जागेत असलेल्या आणि विद्युत जोडणी उपलब्ध असलेल्या ३,८३२ अंगणवाडी केंद्रांची निवड करण्यात आली आहे. या सुविधा 'स्मार्ट अंगणवाडी किट'च्या माध्यमातून पुरविण्यात येणार आहेत. या किटमध्ये ई-लर्निंगसाठी आवश्यक हार्डवेअर व सॉफ्टवेअर, स्वच्छ भारत किट, वॉटर प्युरिफायर, हात धुण्यासाठी बेसिन, इमारतीची रंगरंगोटी आणि आवश्यक किरकोळ दुरुस्ती यांचा समावेश आहे.
याशिवाय पावसाचे पाणी साठविण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि स्वयंपाकघराचे आधुनिकीकरणही करण्यात येणार आहे. या उपक्रमाची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने केली जाणार असून, अंगणवाड्यांमधील शैक्षणिक व भौतिक सुविधा अधिक सक्षम करण्यावर भर दिला जाणार आहे. यामुळे बालकांना सुरुवातीच्या वयातच आधुनिक पद्धतीने शिक्षण घेण्याची संधी मिळेल आणि पोषण व आरोग्य सेवांचा दर्जा सुधारण्यास मदत होईल.
महिला व बालकल्याण विभागाच्या या निर्णयामुळे राज्यातील अंगणवाडी केंद्रांची भौतिक आणि शैक्षणिक पातळी उंचावेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ई-लर्निंग सुविधांमुळे लहान मुलांना शिक्षणासाठी आधुनिक साहित्य उपलब्ध होईल, तर स्वच्छता आणि पाण्याच्या शुद्धीकरणाच्या सुविधांमुळे आरोग्याचा दर्जा उंचावेल.
G.Vaidya--BD