डॉ. दीपा मलिक यांचा मुंबई पुस्तक महोत्सवात प्रेरणादायी संदेश; वाचनसंस्कृती आणि धैर्याचे आवाहन
भारताच्या पहिल्या महिला पॅरालिम्पिक पदकविजेत्या आणि पद्मश्री पुरस्कार सन्मानित डॉ. दीपा मलिक यांनी मुंबई पुस्तक महोत्सवात तरुण पिढीला प्रेरणादायी संदेश दिला. शारीरिक मर्यादा यशातील अडथळा नसून त्यातूनच खऱ्या ध्येयाची ओळख होते, असे प्रतिपादन करत त्यांनी वाचनसंस्कृती आणि सकारात्मकतेचे महत्त्व मांडले.
मुंबई: शारीरिक मर्यादा कधीही व्यक्तीच्या प्रगतीतील अडथळा ठरू शकत नाहीत. उलट, आपल्या दिव्यांगपणानेच मला जगण्याचे खरे ध्येय आणि नवी ऊर्जा मिळाली, असे प्रेरणादायी प्रतिपादन भारताच्या पहिल्या महिला पॅरालिम्पिक पदकविजेत्या आणि पद्मश्री पुरस्कार सन्मानित डॉ. दीपा मलिक यांनी येथे केले. मुंबई विद्यापीठाच्या कालिना संकुलात सुरू असलेल्या ‘मुंबई पुस्तक महोत्सव २०२६’ च्या अंतर्गत आयोजित ‘द करेज टू राइज’ या विशेष सत्रात त्या शुक्रवारी बोलत होत्या. आपल्या ‘ब्रिंग इट ऑन’ या पुस्तकाच्या आणि स्वतःच्या जीवनप्रवासाच्या निमित्ताने त्यांनी तरुण विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
सभागृहातील प्रेक्षकांना उद्देशून बोलताना डॉ. मलिक म्हणाल्या, "लकवा आल्याने माझे शरीर थांबले; पण खेळाने माझे हात थांबवले नाहीत. त्यामुळे शिकत राहाल, तरच जिंकत राहाल." अशा मोलाच्या संदेशास सभागृहाने जोरदार टाळ्यांनी दाद दिली. आयुष्यात येणाऱ्या संकटांना घाबरून न जाता त्यांचा सकारात्मकतेने स्वीकार करायला हवा, असे प्रतिपादन करत त्यांनी स्पष्ट केले की, जेव्हा आपण स्वतःच्या मर्यादांच्या पलीकडे जाऊन आपल्यातील क्षमता ओळखतो, तेव्हाच अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य होतात.
प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात संकटे आणि आव्हाने येतातच. मात्र, त्या आव्हानांना घाबरून मागे हटण्यापेक्षा 'ब्रिंग इट ऑन' (येऊ द्या) अशी सकारात्मक आणि जिद्दीची वृत्ती बाळगणे महत्त्वाचे असते, असे डॉ. मलिक यांनी नमूद केले. अपयश हा यशाच्या प्रवासातील केवळ एक टप्पा आहे, तो अंतिम थांबा नाही. जेव्हा आपण कठीण परिस्थितीचा धैर्याने सामना करतो, तेव्हाच आपल्यातील खऱ्या क्षमतेची ओळख आपल्याला होते, असा अनुभव त्यांनी शेअर केला.
तरुण पिढीला उद्देशून बोलताना डॉ. मलिक यांनी आधुनिक स्पर्धेच्या युगातील मानसिक दडपणाचाही विषय उपस्थित केला. आजच्या काळात तरुणांवर वाढते मानसिक दडपण हा एक मोठा प्रश्न आहे. अशा वेळी वाचन, आत्मपरीक्षण आणि स्वतःवरील विश्वास तुम्हाला योग्य दिशा देऊ शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले. पुस्तके केवळ माहिती देत नाहीत, तर ती संकटात लढण्याचे बळ आणि नवा दृष्टिकोन देतात, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
त्यामुळे तरुणांनी केवळ समाजमाध्यमांपुरते मर्यादित न राहता, दर्जेदार साहित्याचे वाचन करून आपले व्यक्तिमत्त्व समृद्ध केले पाहिजे, असा सल्लाही त्यांनी यानिमित्ताने दिला. मुंबई पुस्तक महोत्सवाच्या या विशेष कार्यक्रमात डॉ. दीपा मलिक यांच्या अनुभवांचा आणि विचारांचा प्रवास तरुणांसाठी प्रेरणेचा स्रोत ठरला.
X.Badami--BD