मुंबई महापालिकेच्या शाळांतील गुणवंत विद्यार्थ्यांची सिंगापूर आणि इस्रो वारी; निविदा प्रक्रिया सुरू
मुंबई महापालिकेच्या शाळांमधील आठवी आणि नववीच्या ३५ गुणवंत विद्यार्थ्यांना सिंगापूर आणि बंगळुरू येथील इस्रो दौऱ्याची संधी मिळणार आहे. या विशेष शैक्षणिक प्रवासासाठी महापालिकेने ई-निविदा प्रसिद्ध केली असून, विज्ञान आणि तंत्रज्ञानाशी संबंधित स्थळांची भेट यात समाविष्ट आहे.
मुंबई महापालिकेच्या (BMC) शिक्षण विभागाने पालिकेच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना विज्ञान, आधुनिक तंत्रज्ञान आणि अवकाश संशोधनाची प्रत्यक्ष ओळख करून देण्यासाठी एक विशेष शैक्षणिक सहलीचे नियोजन केले आहे. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना थेट सिंगापूर तसेच बंगळुरू येथील भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) आणि देशातील इतर महत्त्वपूर्ण शैक्षणिक स्थळांना भेट देण्याची संधी मिळणार आहे.
या विशेष दौऱ्यासाठी पालिका शाळांमधील आठवी आणि नववीच्या वर्गातील ३५ गुणवंत विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे. या विद्यार्थ्यांसोबत ५ शिक्षक देखील सहभागी होणार असून, एकूण ४० जणांचे पथक या दौऱ्यावर जाणार आहे. विज्ञान परीक्षा आणि विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना प्रोत्साहन देणे हा यामागील मुख्य उद्देश असल्याचे सूत्रांनी सांगितले.
सिंगापूर दौरा: पाच ते सहा दिवसांच्या या दौऱ्यात विद्यार्थ्यांना सिंगापूरमधील विज्ञान आणि तंत्रज्ञानाशी संबंधित शैक्षणिक स्थळांची भेट दिली जाईल. या प्रवासासाठी प्रतिविद्यार्थी सुमारे दीड लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.
इस्रो (बंगळुरू) भेट: देशातील अवकाश संशोधनाचे कार्य जवळून अनुभवण्यासाठी बंगळुरूतील इस्रो भेटीचा पर्याय देखील यात समाविष्ट आहे. या दौऱ्यासाठी प्रतिविद्यार्थी ४० ते ५० हजार रुपये खर्च अपेक्षित आहे.
निविदा प्रक्रिया: या संपूर्ण सहलीचे नियोजन, संयोजन आणि आयोजन करण्यासाठी अनुभवी एजन्सीची नियुक्ती केली जाणार असून, त्यासाठी महापालिकेच्या शिक्षण विभागाने ई-निविदेद्वारे प्रस्ताव मागवले आहेत. या निविदेच्या आधारे योग्य एजन्सीची निवड करून दौऱ्याचे तपशीलवार नियोजन करण्यात येईल.
या उपक्रमाचा उद्देश केवळ पर्यटनापुरता मर्यादित नसून, विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञान आणि अवकाश संशोधनाच्या क्षेत्रातील प्रगतीची ओळख करून देणे हा आहे. अशा प्रकारच्या विशेष शैक्षणिक सहल्यांमुळे विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनात नवीनता येण्यास मदत होईल आणि ते भविष्यातील शास्त्रज्ञ किंवा तंत्रज्ञ म्हणून अधिक प्रेरित होतील, अशी अपेक्षा महापालिकेकडून व्यक्त केली जात आहे.
P.Raval--BD